दाभिल पाठोपाठ आता असनियेतही पट्टेरी वाघ ?
कुत्र्याचा पाडला फडशा ; वाघच असल्याचा ग्रामस्थांचा दावा
ओटवणे प्रतिनिधी
दाभिल पाठोपाठ आता असनिये भागातही पट्टेरी वाघाची दहशद आहे. या पट्टेरी वाघाने असनिये कणेवाडीत कुत्र्यावर झडप घालून त्याचा फडशा पाडल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. त्यामुळे असनिये परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.कणेवाडी येथील दिनेश सावंत हा युवक शुक्रवारी रात्री घराच्या दर्शनी भागात झोपल्यानंतर पहाटे गाढ झोपेत असतानाच या पट्टेरी वाघाने कुत्र्याला लक्ष तरी त्याचा फडशा पाडला. सकाळीच दिनेश सावंत याला जाग आल्यानंतर कुत्रा नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांने याचा माग काढला असता त्याला या पटेरी वाघाच्या पायाचे अनेक ठसे मिळाले. या परिसरात पट्टेरी वाघ अनेक वेळा ग्रामस्थांना दृष्टीस पडत असून हा बिबट्या नसून पटेरी वाघच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी या पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे ही टिपले. पट्टेरी वाघाच्या या दहशतीमुळे बागायतीमध्ये काजू गोळा करण्यासाठी आणि लाकडांसाठी जंगलात जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याने याची तात्काळ दखल घेऊन या पट्टेरी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.दरम्यान याबाबत निवृत्त विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक तसेच बांदा वनपाल प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांनी टिपलेले हे ठसे पट्टेरी वाघाचे नसून ते बिबट्याचे आहेत. तसेच वाघ जंगलातून भर वस्तीत येऊन शिकार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा बिबट्या असल्याचे सांगितले.