मसुरेतील वीज प्रश्नाबाबत संतप्त ग्रामस्थांची महावितरणला धडक
मसुरे प्रतिनिधी
मसुरे गावामध्ये गेली अनेक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असून अनेक वीज प्रश्न प्रलंबित राहिल्यामुळे ग्रामस्थांना याचा मोठा फटका बसत होता. याबाबत अखेर येथील ग्रामस्थांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी परब आणि युवा कार्यकर्ते पंढरीनाथ मसुरकर, सुहास पेडणेकर, जितेंद्र परब यांच्या मार्गदर्शनाखाली विरण येथील वीज वितरणच्या कार्यालयामध्ये सोमवारी संध्याकाळी धडक देऊन अधिकारी वर्गाला मसुरे येथील वीज प्रश्नांबाबत धारेवर धरले. यावेळी जमलेले ग्रामस्थ आक्रमक झाले होते.यावेळी मसुरे येथील प्रलंबित वीज प्रश्नाबाबत आणि ग्राहकांना होणाऱ्या समस्यांबाबत जास्तीत जास्त सकारात्मक प्रयत्न करून येथील वीज प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ते सहकार्य करण्याचे आश्वासन मसुरे येथील ग्रामस्थांना विरण येथील कनिष्ठ सहाय्यक अभियंता तुषार गावकर यांनी दिले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कनिष्ठ अभियंता तुषार गावकर यांना वीज वितरण च्या समस्याचे निवेदनही देण्यात आले. मसुरे येथे गेले अनेक दिवस विजेचा खेळखंडोबा सुरू असून वारंवार वीज गायब होणे, गेलेली वीज बरेच तास पुन्हा न येणे, रात्र प्रसंगी वीज जाण्याचे प्रकार वाढणे, प्रत्येक ठिकाणी कमी दाबाने वीज प्रवाह चालू असणे, काही भागात वीज असणे तर काही भागात वीज नसणे अशा प्रकारामध्ये वाढ झालेली होती. यामुळे येथील वीज ग्राहक हैराण झाले होते. मसुरे गाव हा पूरग्रस्त भागांमध्ये येत असून या मध्ये मसुरे कावावाडी, टोकळवाडी, ऊसलाट वाडी,सय्यद जुवा, खोत जुवा, मसूरकर जुवा हे भाग प्रामुख्याने नदीकिनारी येत आहेत तसेच उर्वरित मसुरे गावातील वाड्या या अतिशय दुर्गम ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी वीज गायब झाल्यास येथील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळी वातावरण असून या ठिकाणी वीज गायब झाल्यास आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, तसेच शैक्षणिक सुद्धा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. व्यापारी वर्गाला सुद्धा विजेच्या खेळ खंडोबाचा मोठा फटका बसत आहे. या व्यतिरिक्त ग्रामस्थांचे विजेच्या संदर्भात विविध प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये प्रामुख्याने मार्गाचीतड पासून मसुरे मर्डे पर्यंत अकरा केवी लाईन बसविणे बाकी असल्याने या भागामध्ये कमी दाबाने वीज पुरवठा सुरू आहे.पूर्वी मसुरे मर्डे ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रत्येक गुरुवारी विरण वीज वितरण चा कनिष्ठ अभियंता येथे ग्रामस्थांच्या तक्रारी निवारण साठी येत होते परंतु गेले कित्येक महिने या ठिकाणी संबंधित अधिकारी वर्ग येत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या समस्या बाकी राहत आहेत. तसेच अनेक प्रश्नांबाबत सामाजिक कार्यकर्ते शिवाजी परब आणि पंढरी मसुरकर यांनी समस्यांचा पाढा वाचून अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले. प्रशासनाकडून मंजूर कामे ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर करण्याच्या वीज वितरण च्या कामाबाबतही यावेळी नाराजी व्यक्त करण्यात आली.यापुढील वीज वितरण च्या शासकीय कामाबाबत येथील ग्रामस्थांशी, मर्डे ग्रामपंचायत तसेच प्रमुख लोकप्रतिनिधींशी चर्चा विनिमय करूनच कामाचे स्वरूप ठरवावे अशी मागणी शिवाजी परब यांनी यावेळी केली. विरण वीज वितरण कार्यालया अंतर्गत लगतची 15 गावे येत असून या ठिकाणी कनिष्ठ अभियंता पद आणि कर्मचारी वर्ग पदे रिक्त आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात वीज समस्या निर्माण झालेल्या आहेत.याबाबतची माहिती तुषार गावकर यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली तरीसुद्धा मसुरे गावचा वीज प्रश्न सोडविण्यासाठी आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्याने योग्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासनही यावेळी तुषार गावकर आणि मुख्य लाईनमन महेंद्र घाडी यांनी दिले. शासन स्तरावरती वीज वितरण च्या समस्येबाबत लागणारा निधी आणि प्रलंबित प्रश्नांबाबत मागणी सुद्धा सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्याचेही यावेळी शिवाजी परब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी ठरविण्यात आले. मसुरे वीज वितरण च्या ग्राहकांना काहीही समस्या निर्माण झाल्यास विरण येथील मुख्य लाईन मान महेंद्र घाडी यांना संपर्क करण्याचेही यावेळी सांगण्यात आले.यावेळी शिवाजी परब, पंढरी मसुरकर, जितेंद्र परब, कृष्णा पाटील, सचिन पाटकर, जीवन मुणगेकर, हेमंत परब, पांडुरंग गोलतकर, सुहास पेडणेकर, सागर पाटील, श्री राऊत, धनेश हिंदळेकर, सतीश मसुरकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मुख्य लाईन मन महेंद्र घाडी यांनी सुद्धा उपस्थित ग्रामस्थांना वीज समस्यांबाबत मार्गदर्शन करून अपुरा कर्मचारी वर्ग असला तरीही मसूरे येथील वीज ग्राहकांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याचेही आश्वासन दिले. मसुरे येथील निर्माण होणाऱ्या वीज प्रश्नांबाबत येथे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही या समस्या सोडविण्यासाठी योग्य त्या सूचना देण्याचे ही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले. या सर्व प्रश्नांबाबत मसूर येथील वीज ग्राहकांचे प्रश्न सुटले नाहीत तर पुन्हा एकदा विरण वीज वितरण कार्यालय येथे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने शिवाजी परब पंढरी मसुरकर सुहास पेडणेकर आदींनी दिला.