For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाण्यावर वसलेले गाव

06:03 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाण्यावर वसलेले गाव
Advertisement

भारतातील मणीपूर राज्यात एक अद्भूत स्थान आहे. येथील घरे भूमीवर नाहीत, तर पाण्यात तरंगत आहेत. येथील सारे जीवनच पाण्यावर तरंगणारे आहे. या स्थानाखाली लोहटक नावाचे एक सरोवर आहे आणि या सरोवरावर घरे तरंगत आहेत. पाण्याच्या लाटांसोबत ही घरे डोलतात आणि इकडे तिकडे हालतात. अशावेळी या घरांमध्ये उभे राहता येणेही कठीण असते. येथील घरांचे दरवाजे उघडले की घराबाहेरचा रस्ता नव्हे, तर चमकते पाणी पहावयास मिळते. हे स्थान आणि लोकटक सरोवर निसर्गाचा एक महान चमत्कार मानला जातो. तो पाहण्यासाठी येथे नेहमी पर्यटक येत असतात. हे सरोवर जवळपास 240 चौरस किलोमीटर आकाराचे आहे. ते प्राचीन असून तेथे वास्तव्य करणाऱ्या माणसांनी पूर्वापारपासून ही जलजीवनशैली आत्मसात केली आहे. या सरोवरात केवळ घरेच आहेत, असे नसून काही द्वीपेही आहेत. तीही स्थिर नसून पाण्यासमवेत हलत आणि वहात असतात. स्थानिक भाषेत अशा द्वीपांना ‘फुमदी’ अशी संज्ञा आहे.

Advertisement

आकाशातून तर हे सरोवर अधिक विलोभनीय दिसते. जणू काही एक प्रचंड मोठा आरसा भूमीवर असल्याचा भास होतो, असे पर्यटकांचे म्हणणे असते. या सरोवरातील घरांमध्ये वास्तव्य करणारी माणसे एका स्थानातून दुसऱ्या स्थानी जाण्यासाठी नावांचा उपयोग करतात. बाजारहाट इत्यादी नित्य-नैमित्तिक कामेही नावांच्या माध्यमातूनच चालतात. या सरोवरात काही शाळाही आहेत. या शाळांमध्ये जाताना विद्यार्थी-विद्यार्थिनीही नावांचाच उपयोग करतात. अशा प्रकारे, हे एक तरते गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्याची ख्याती केवळ भारताभरच नव्हे, तर जगातही पसरलेली आहे. अनेक विदेशी प्रवासी येथे हे सरोवर आणि त्यातील मानवी जीवन पाहण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी येतात. एकंदर, हे सरोवर आणि त्यावर तरंगणारे गाव हे एक अद्भूत स्थान म्हणून परिचित आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.