बहिऱ्यांचा गाव...
तुर्किये देशात गोकोवा नामक एक ग्राम आहे. या गावाचे वैशिट्या असे की या गावातील निम्म्याहून अधिक लोक ठार बहिरे आहेत. त्यांच्या जन्मापासूनच ऐकू येत नाही. या गावाची लोकसंख्या तशी जास्त नाही. केवळ 120 लोक येथे राहतात. तथापि, त्यांच्यापैकी बव्हंशी बहिरे आहेत. या गावात जी अर्भके जन्माला येतात, त्यांच्यापैकी निम्म्याहून अधिक बहिरी असतात. संशोधकांनी यामागच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या हाती अतिशय गंभीर अशी कारणे लागली आहेत. ही कारणे या गावातील लोकांच्या एका विशिष्ट परंपरेशी निगडीत आहेत. ही परंपरा नात्यातील विवाहांची असल्याचे दिसून आले आहे.
या गावातील बहुतेक लोक एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे विवाह जवळच्या नात्यांमध्येच होतात. या पद्धतीला शास्त्रीय भाषेत ‘इनब्रिडींग’ असे म्हणतात. आपल्या कुटुंबातच विवाहसंबंध स्थापन करण्याच्या पद्धतीमुळे हा जन्मजात दोष येथील बहुतेक अर्भकांमध्ये आहे, असे दिसून आले आहे. कुटुंबांतर्गत विवाह करण्याची प्रथा प्रदीर्घ काळ एखाद्या गावात असल्यास त्या गावात शारिरिक व्यंग असलेल्या मुलांच्या जन्माचे प्रमाण मोठे असते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. तुर्कियेतील या गावात बहिरेपणाची ही समस्या कित्येत शतकांपासूनची आहे, असे दिसून आले आहे. त्यामुळे संशोधकांच्या म्हणण्याला पुष्टी मिळत आहे. तथापि, काही तज्ञांचे मत यापेक्षा वेगळे आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार या गावात ही समस्या इतक्या मोठ्या प्रमाणात फैलावण्याचे कारण केवळ इनब्रिडींगची प्रथा हे नाही. या गावातील लोक अस्वच्छ पाणी पितात. शतकानुशतकाच्या सवयीमुळे ते असे पाणी पचवू शकतात. तथापि, या अस्वच्छ पाण्याचा काही ना काही परिणाम त्यांच्या शरीरावर झाल्याशिवाय राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना हे बहिरेपण आलेले आहे. या गावात मिळणाऱ्या पाण्यात काही रासायनिक पदार्थ असे आहेत, की जे कानांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. त्यामुळे या गावात बहिरेपणाची समस्या आहे. आता यापैकी नेमके कारण कोणते, हा पुन्हा संशोधनाचाच विषय आहे. पण इनब्रिडींगमुळे शारिरीक व्यंग, बौद्धिक समस्या निर्माण होतात, हे अनेक संशोधनांमधून दिसून आले आहे. वेशेषत: ज्या समाजांची लोकसंख्या कमी असते, त्या समाजांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात आहे, असेही अनेक देशांमध्ये आणि अनेक समाजांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात आढळून आले आहे.