नगरपंचायतीचा दर्जा मिळाला, पण गावचा विकास कधी?
संभाजीनगर मच्छे अडकलेय समस्यांच्या गर्तेत : नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित : प्रशासनाचे दुर्लक्ष : नळांना पाणीच नाही
आण्णाप्पा पाटील/बहाद्दरवाडी
मच्छे ग्रामपंचायतीला 2021 साली नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. नगरपंचायत झाल्यामुळे या भागातील विकासकामे अधिक होणे अपेक्षित होते. मात्र नागरी सुविधा पुरविण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होत आहेत. मच्छे येथील संभाजीनगर नागरिक समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. गेल्या आठ वर्षांपासून पाणी नाही. गटारींची साफसफाई करण्यात आली नाही. झाडे-झुडपे वाढलेली आहेत. नगरपंचायतीचा दर्जा मिळाला पण विकास कधी? असा सवाल नागरिक करताना दिसत आहेत.
बेळगाव तालुक्मयातील 47 ग्रामपंचायत सदस्य असणारी सर्वात मोठी मच्छे ग्रामपंचायत होती. याचबरोबर पिरनवाडी ग्रामपंचायतमध्ये 45 सदस्य होते. या दोन्ही ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. मच्छे औद्योगिक वसाहत व शहरालगत असलेल्या मच्छे व पिरनवाडी नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावांचा व नगरांचा विकास व्हायला पाहिजे. आजही इथल्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे.
मच्छे संभाजीनगरामध्ये पिण्याचे पाणी नाही, गटारींची साफसफाई करण्यात आलेली नाही. झाडे-झुडपे वाढलेली आहेत. अशा अनेक समस्यांच्या गर्तेत संभाजीनगर अडकलेले आहे. संभाजीनगरात चार गल्ल्या आहेत. या नगरातील नळांना पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आजूबाजूला असलेल्या शिवारातील विहिरींचे तसेच कूपनलिकांचे पाणी नागरिक आणत आहेत. महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.
नागरिकांना टँकरने पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. नगरपंचायतीला अनेकवेळा सांगूनही इथल्या पाणी समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मग आम्ही दाद मागायची कुणाकडे, असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत. गटारी सांडपाण्याने तुंबलेल्या आहेत. या गटारीमधून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे वयोवृद्ध व लहान बालकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. प्रशासनामार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याचे फोटो व्हायरल करण्यात येतात. पण, संभाजीनगरची स्वच्छता का केली जात नाही? याला जबाबदार कोण? असे इथल्या महिला विचारत आहेत.
पाणी विकत घेण्याची वेळ
संभाजीनगरातील चौथा क्रॉस येथे एका कूपनलिकेची खोदाई करण्यात आली होती व त्याचे पाणी एका टाकीत सोडून पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र, गेल्या आठ वर्षापासून या गल्लीतील पाणीपुरवठा बंद आहे. या नगरात पाणी येत नसल्यामुळे नागरिक टँकरने विकत पाणी घेत आहेत. एका टँकरला 300 ते 400 ऊपये त्यांना द्यावे लागतात. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते पाणी विकत घेऊ शकतात. मात्र सर्वसामान्य नागरिकांना ते परवडणारे नाही. गेल्या वर्षभरापासून गटारींची साफसफाई केली नाही. त्यामुळे गटारीमध्ये सांडपाणी साचले आहे. त्यामुळे डेंग्यूसारख्या रोगाची लागण झाल्यावरच प्रशासनाला व इथल्या नगरपंचायतीला जाग येणार का? असा प्रŽ उपस्थित झाला आहे.
महिलांचा रोजगार झाला बंद
मच्छे गावातील नागरिकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. बेळगाव-पणजी महामार्गाजवळ मच्छे औद्योगिक वसाहत असल्यामुळे या गावचा विस्तार झपाट्याने झाला आहे. विविध नगरे निर्माण झाली आहेत. पूर्वी ग्रामपंचायत होती. यावेळी महिलांना ग्रामपंचायतीमधून रोजगार उपलब्ध होत होता. 2021 पासून नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर रोजगार हमी योजनेच्या लाभार्थी महिलांचा रोजगारच बंद झाला आहे, अशी माहिती महिलांनी दिली.
शुद्ध पिण्याच्या पाण्याचे यंत्र बसवण्याची मागणी
मच्छे येथील नगरपंचायतीच्या बाजुलाच शुद्ध पिण्याच्या पाण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे. अशा पद्धतीचे पिण्याच्या शुद्ध पाण्याचे यंत्र संभाजीनगरमध्ये बसविण्याची गरज आहे. तसेच गावच्या विहिरीचे पाणी पाईपलाईनद्वारे या यंत्राच्या ठिकाणी आणावे. जेणेकरून नागरिकांना पैसे घालून किमान पिण्याचे पाणी तरी उपलब्ध होईल. या नगरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचे यंत्र त्वरित बसवण्याची मागणी नागरिक करत आहेत.
करात वाढ, सुविधांचा अभाव
पिण्याच्या पाण्यासाठी आमच्यावर भटकंती करण्याची वेळ आली आहे. तसेच टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. याचा विनाकारण आम्हाला भुर्दंड सहन करावा लागत आहे. आम्ही नगरपंचायतीला पाणीपट्टी, घरपट्टी भरतो. पूर्वी ग्रामपंचायत होती. त्यावेळी पाणी व घरपट्टी कमी प्रमाणात घेण्यात येत होती. मात्र सध्या नगरपंचायत झाली असल्यामुळे पाणी व घरपट्टीच्या करामध्ये वाढ झाली आहे. कर भरूनही नळांना पाणी नाही. नगरपंचायतीच्या नोडल अधिकाऱ्यांनी आमच्या नगरात येऊन पाहणी करण्याची गरज आहे.
-निशा हावळ
नोडल अधिकाऱ्यांनी उपायायोजना करावी
संभाजीनगरात नागरिकांनी स्वत: कूपनलिकांची खोदाई केली. मात्र इथे पाणीच लागत नाही. त्यामुळे तिथल्या नागरिकांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. मच्छे येथील तलावाचे पुनऊज्जीवन करण्यात आले आहे. सध्या या तलावात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. या तलावाचे पाणी संभाजी नगरात सोडण्यासाठी नगरपंचायतीने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाऱ्यांनी योग्य ती उपाययोजना करावी.
- लक्ष्मी सावंत

