For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिन, मूढ, दुराचारी लोक असुरी कृत्ये करण्यात धन्यता मानतात

06:30 AM Jul 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिन  मूढ  दुराचारी लोक असुरी कृत्ये करण्यात धन्यता मानतात
Advertisement

माऊली म्हणतात, सर्वभावाने भगवंतांना भजणारे भक्त मायानदी सहज तरून जातात कारण त्यांना सद्गुरुरुपी नावाडी लाभलेला असतो. त्यांच्या भक्तीमुळे मायानदीचा प्रभाव नष्ट होऊन ते अलीकडील काठावर असतानाच मायानदीचे पाणी आटून जाते. त्यांनी आत्मानुभावरूपी कासोटा घट्ट बांधला असून त्यांना आत्मनिवेदनरूपी होडी हस्तगत झालेली असते. त्यांनी अहंभावाचे ओझे टाकून दिलेले असते.

Advertisement

मायानदी तरुन जाण्याच्या अन्य विकल्पांना रजा दिलेली असते. त्यांच्या संसारावरील प्रेमाला ओहोटी लागलेली असते. त्यांना जीव व परमात्मा यांच्या ऐक्यरूपी उतार असलेल्या पाण्यात ज्ञानरूपी सोपी पायवाट सापडून ते पलिकडच्या निवृत्तिरूपी तीराकडे वळलेले असतात. वैराग्यरूपी हातांनी ते मायानदीचे उफाणणारे पाणी सहजी तोडतात कारण त्यांना तेच परमात्मा असल्याने मायानदी माझे काहीही वाकडे करू शकत नाही ही खात्री पटलेली असते. त्या बळावर तोल सांभाळत, कसल्याही अडचणीत न पडता, ते निवृत्तिरूपी काठ गाठतात. मायानदी तरुन जाण्यासाठी जे भगवंतांच्या भजनी लागतात ते तरून जातात परंतु असे भक्त फार थोडे आहेत.

भगवंत पुढील श्लोकात सांगतात की, मला शरण न येणाऱ्या दुष्कर्मी, मूर्ख व अधम माणसांची विचारशक्ती नष्ट झालेली असते. त्यांच्या ज्ञानावर मायेने घातलेल्या अज्ञानाच्या पांघरुणामुळे ते मला शरण न येता आसुरी मार्गाचा अवलंब करतात.

Advertisement

हीन मूढ दुराचारी माझा आश्रय सोडिती। मायेने भ्रांत होऊनि आसुरी भाव जोडिती ।।15।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, हीन मूढ दुराचारी लोकांना मायानदी पार करणे अशक्य होते कारण त्यांच्यात अहंकाररूपी भूताचा संचार झालेला असतो. त्यामुळे त्यांना आत्मस्वरुपाची विस्मृती झालेली असते. त्यांना नियमरूप वस्त्राची आठवण रहात नाही, पुढे होणाऱ्या अधोगतीची लाज वाटत नाही. त्यामुळे वेद ज्या गोष्टी करू नये म्हणून म्हणतो त्या गोष्टी ते अवश्य करतात. भगवंत आपले कैवारी असून आपले हितचिंतक आहेत ह्यावर ते ठाम नसल्याने ते त्यांच्याठायी निष्ठा ठेऊ शकत नाहीत. जे दुविधेमध्ये असतात त्यांचे विचारचक्र थांबत नसल्याने ईश्वरचरणी त्यांचा भाव दृढ होत नाही. परिणामी ते मायानदीचे पाणी कापून पैलतीरी असलेल्या भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. खेदाची गोष्ट अशी की, असेच लोक बहुसंख्येने असतात. अहंकारामुळे मायानदी पार करू न शकणाऱ्या लोकांना आत्मस्वरुपाची विस्मृती झालेली असते.

ज्या कामाकरता त्यांना मनुष्यजन्म मिळालेला असतो ते करायचे सोडून इंद्रियांच्या आहारी जातात. मी माझेपणाच्या भावनेने, इच्छा, द्वेष, सुख, दु:ख अशा नानाप्रकारच्या विकारांना बळी पडतात. त्यातून वाट्याला येणाऱ्या कितीतरी दु:खद प्रसंगाना त्यांना तोंड द्यावे लागते पण हे सर्व विसरून ते विषयोपभोगात रममाण होतात. ईश्वरावर अविश्वास दाखवणारे हिन, मूढ, दुराचारी लोक मायेच्या प्रभावामुळे भ्रमिष्ट होऊन असुरी कृत्ये करण्यात धन्यता मानतात त्यामुळे ते ईश्वराला प्राप्त करून घेऊ शकत नाहीत.

क्रमश:

Advertisement
Tags :

.