For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विलासकाकांचे कार्य उदयदादांनी ताकदीने पुढे न्यावे! पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन

11:54 AM Sep 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
विलासकाकांचे कार्य उदयदादांनी ताकदीने पुढे न्यावे  पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन
Vilas Undalkar
Advertisement

कोयना दूध संघावर काकांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण
कराड प्रतिनिधी

Advertisement

सहकारात नियोजनबद्ध काम आणि आर्थिक शिस्त असली की संस्था कशी प्रगती करतात, हे दिवंगत विलासकाकांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. विलासकाकांचे कार्य त्यांचे सुपुत्र अॅड. उदयसिंह पाटील यांनी ताकदीने पुढे न्यावे, असे आवाहन राज्याचे उत्पादन शुल्क व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

खोडशी (ता. कराड) येथे कोयना दूध संघावर दिवंगत लोकनेते विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कणेरीचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज स्वामी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, नितीन भरगुडे-पाटील, युवा नेते मनोज घोरपडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अमित कदम यांच्यासह जिल्ह्यातील काकाप्रेमींची उपस्थिती होती.

Advertisement

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्राची प्रगती दूरदृष्टी असणारे नेते आणि सहकारामुळे झाली. शेतकऱ्यांनी सहकाराचे जाळे निर्माण करण्याचे धाडस केले. राजकीय जोडे बाहेर काढून सहकारी संस्था चालवल्या तर कोणत्याही अडचणी येत नाहीत, हे विलासकाकांनी आपल्या कृतीतून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाने कोयना दूध संघ हा आर्थिक शिस्त असणारी संस्था म्हणून नावारूपास आली आहे. काकांनी कराड दक्षिणचे 35 वर्षे अभ्यासू नेतृत्व केले. संस्था बारकाव्याने मोठ्या करण्यात त्यांचे योगदान आहे. विलासकाकांचा पूर्णाकृती पुतळा नव्या पिढीला प्रेरित करणारा आहे. स्मारके, ग्रंथ, पुतळे या माध्यमातून विलासकाकांचे काम नवीन पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न उदयदादांनी करावा. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.

काकांनी कोयना दूध संघाचे विस्तारीकरण केले
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, विलासकाकांनी अनन्यसाधारण काम करून ठसा उमटवला. लोकांनी त्यांच्यावर प्रचंड प्रेम केले. त्यांनी तळागाळातील माणसांशी नाळ जोडली. काकांनी कोयना दूध संघाचे विस्तारीकरण केले. सत्तेचे विकेंद्रीकरण व सर्वसामान्यांना सत्तेची संधी हे महत्वाचे सूत्र काकांच्या नेतृत्वात होते. काकांनी नेतृत्व केलेल्या संस्था उदयदादा बळकटी देऊन आणखी उंचीवर नेत आहेत. भविष्यात काकांपेक्षाही मोठे काम उदयदादा करतील. देशाच्या कृषी उत्पन्नात दुधाचा वाटा 30 टक्के असून महाराष्ट्रात अजूनही दूध व्यवसायाला वाव आहे.

काकांनी वंचितांसाठी काम केले
मठाधिपती काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, विलासकाकांनी वंचित, मागास, पिचलेल्या लोकांसाठी काम केले. त्यांनी जेवढ्या लोकांना नोकऱ्या लावल्या, तितक्या इतरांना जमल्या नाहीत. लढवय्या, सर्वसमावेशक, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे, कार्यसम्राट, न डगमगणारे व उन्नत विचारांचे गुण काकांकडे होते. काका व सामान्य जनतेच्या आशीर्वादाने उदयदादा विविध संस्था पुढे नेत आहेत. या संस्था चांगल्या चालवण्यास दादांचे यापुढेही प्राधान्य असेल. काकांचे कार्य यापुढेही प्रेरणा देत राहिल. रयत कारखान्याचे अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी प्रास्ताविकात कोयना दूध संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला. कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मणराव देसाई यांनी आभार मानले.

कार्यक्रमास माजी सभापती भीमराव पाटील, उद्योजक राम निंबाळकर, श्याम निंबाळकर, अॅड. इंद्रजीत चव्हाण, अॅड. विजय पाटील, शिवनेरी शुगरचे संचालक अधिराज पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, रयत संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा. धनाजी काटकर, वसंतराव जगदाळे, व्हाइस चेअरमन शिवाजीराव जाधव, संघाचे कार्यकारी संचालक अमोल गायकवाड, कोयना दूध संघाचे संचालक संपतराव इंगवले, दीपक पिसाळ, शिवाजीराव शिंदे, तानाजीराव शेवाळे, सुदाम चव्हाण व जिह्यातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

साडूचा सल्ला
विलासकाकांनी कराड दक्षिणचे 35 वर्षे नेतृत्व करताना सामान्यांशी नाळ जोडली. अगदी कसणीच्या धनगरवाड्यातील व्यक्तीलाही ते नाव घेऊन बोलवत. यातून उदयदादांनीही शिकले पाहिजे. थोरला साडू म्हणून त्यांना सल्ला देण्याचा अधिकार मला आहे, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगताच कार्यक्रमात हशा पिकला.

Advertisement
Tags :

.