होय, माझ्या सांगण्यावरून विक्रांत अजितदादांना भेटला! चिपळुणातील भेटीवर शिवसेना नेते भास्कर जाधवांचे स्पष्टीकरण
काही उच्च प्रथा, परपंरा आहेत त्या जपायच्या असतात.
चिपळूण प्रतिनिधी
आपल्याकडे काही उच्च परंपरा, प्रथा आहेत आणि त्या आपल्याला जपायच्या असतात, त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चिपळुणला येत असल्याने मीच विक्रांतला सांगितलं होत की अजितदादां जाऊन सत्कार कर. माझ्याच सांगण्यावरुन तो अजित पवारांना भेटला होता, असे स्पष्टीकरण शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी येथे दिले.
राष्ट्रवादीच्या जन सन्मान यात्रेच्या निमित्ताने शनिवारी चिपळूण दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आमदार भास्कर जाधव यांचे सुपूत्र विक्रांत जाधव यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे चिपळुणात आले असता आमदार भास्कर जाधव यांच्यासह विक्रांत जाधव यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधत भेटीबाबत स्पष्टीकरण दिले.
आमदार जाधव पुढे म्हणाले की, शरद पवार हे माझ्याकरता दैवत आहेत. १९९५ साली मी पहिल्यांदा आमदार झालो. त्यानंतर मी कोल्हापूरला गेलो होतो. त्यावेळी १९५२ साली झालेले खासदार रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी माझा कोल्हापूरमध्ये सत्कार केला. त्यावेळी ते म्हणाले होते की, माझ्या जिह्यामध्ये, तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तरी त्याला मी शाल, श्रीफळ पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो. असे काही विचार मनावर कोरले जातात आणि त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाचा नेता जरी आला, म्हणजे देवेंद्र फडणवीस आले होते, चंद्रशेखर बावनकुळे आले होते, त्यांचेही मी शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले होते.