महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘विक्रमादित्य’...नाबाद 75 !

06:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय क्रिकेट रसिकांच्या काही पिढ्या वाढल्या त्या सुनील गावस्करांची फलंदाजी पाहत...त्यांचा ‘फ्लिक’, ‘स्ट्रेट ड्राईव्ह’, ‘ऑन ड्राईव्ह’ अन् ‘पर्फेक्ट’ बचाव यांनी जे गारूड घातलं ते अजूनही त्यांच्या मनावरून उतरलेलं नसेल. महाकाय शरीरयष्टीचे गोलंदाज अक्षरश: भाजून काढत असताना एक फारशी उंची नसलेला फलंदाज त्यांना झुगारून लावतोय हे चित्रच मुळी भारतीयांना वेड लावणारं होतं...भारतीय क्रिकेटला ‘सनी डेज’ दाखविणाऱ्या या ‘लिटल मास्टर’नं नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्नानं ‘विक्रमादित्या’ला केलेला हा सलाम...

Advertisement

समोर पलटण कोण उभी होती ?....वेस्ट इंडिजचे अँडी रॉबर्ट्स, स्व. माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग, ज्योएल गार्नर ही आग ओकणारी महाभयानक चौकडी, पाकिस्तानचे तत्कालीन कर्णधार इम्रान खान नि सर्फराझ नवाज, लेगस्पिनर अब्दुल कादिर, न्यूझीलंडचे ‘स्विंगचे सुलतान’ रिचर्ड हॅडली, ऑस्ट्रेलियाचे डेनिस लीली, थॉमसन व पास्को अन् इंग्लंडचे बॉब विलीस, जेफ अर्नोल्ड, ख्रिस ओल्ड, जॉन स्नो, डेरेक अंडरवूड...पण त्यांना जराही भीक न घालणाऱ्या, निर्भयपणे भिडणाऱ्या ‘त्या’ वामनमूर्तीची जडणघडण झाली ती बार्बाडोससारख्या वेगवान खेळपट्ट्यांचा देश नसलेल्या भारतात आणि तोच खराखुरा चमत्कार...

Advertisement

प्रत्येक दिवशी एक नवं आव्हान स्वीकारण्याइतकं फिटनेस टिकविणं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16-17 वर्षं फॉर्म राखणं, कसोटी सामन्यांतील त्या महान गोलंदाजांना सातत्यानं ‘हेल्मेट’शिवाय तोंड देणं म्हणजे मस्करी नव्हे...त्यासाठी पाहिजे प्रचंड शिस्त, एखादं व्रत घेतल्याची मानसिकता, विशिष्ट रस्त्यानं जाण्याचा संयम अन् जिगरबाज वृत्ती...सुनील मनोहर गावस्कर !...

.बुधवारी वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या महान सुनील गावस्करांचा रुबाब, त्यांचं ‘पॉझिटिव्ह’ व्यक्तिमत्व, त्यांच्याभोवतीचं वलय...सारंच आगळवेगळं. त्याला तोड नाही, त्याच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही...सुनील गावस्कर या हिमालयाची उंची गाठलेल्या दोन शब्दांना एका लहानशा लेखात बांधणं अतिशय अवघङ..अद्वितीय वेस्ट इंडिज संघाला स्वत:च्या बळावर चिरडणाऱ्या, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, बिशनसिंह बेदी, वेंकटराघवन, इरापल्ली प्रसन्ना, चंद्रशेखर, चेतन चौहान, मोहिंदर अमरनाथ यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंची कारकीर्द फुलताना न्याहाळणाऱ्या सुनील मनोहर गावस्करांची कुठकुठली रुपं आठवावीत तेच कळेनासं होणारं...जवळपास दोन दशकं आपल्या तळपत्या बॅटच्या साहाय्यानं अवघ्या क्रिकेट विश्वावर हुकूमत गाजविलेल्या गावस्करांनी 125 व्या कसोटी  सामन्यात निवृत्ती जाहीर केल्यानंतर वाटलं की, आता क्रिकेट बघायचं तरी कुणासाठी ?....

सुनील गावस्करनी खेळत राहावं असंच वाटायचं. पन्नाशी गाठावी अशी इच्छा उत्पन्न व्हायची आणि अर्धशतक पूर्ण केलं की, वेध लागायचे ते शतकाचे...ताण सतत सहन करणं, कोट्यावधी लोकांचा दबाव पेलणं म्हणजे येरागबाळ्याचं काम नव्हे. गावस्करना सुद्धा ते कधी कधी असह्य झालेलं असणारच, पण त्याचं दर्शन त्यानी कधीही घडविलं नाही...10 जुलै, 1949 रोजी जन्मलेले सुनील गावस्कर म्हणजे देवानं दिलेली व अजूनही टिकलेली जबरदस्त एकाग्रता, बुलंद तंत्र, अफलातून कौशल्य अन् अप्रतिम फटके खेळण्याची ताकद यांचं जणू रसायनच...बलाढ्या गोलंदाजांच्या त्या काळात भारतीय संघाचे पाय लटपटले नाहीत ते केवळ त्यांच्यामुळंच...

इतरावर वर्चस्व गाजविण्याच्या सुनील गावस्कर यांच्या वृत्तीचं दर्शन कारकिर्दीतील पहिल्याच वेस्ट इंडिज दौऱ्यात घडलं होतं अन् त्यानंतर पुन्हा पुन्हा घडतच राहिलं. त्यांचा उत्साह, डावाची सुरुवात करताना केलेली आकर्षक फलंदाजी...सारंच अफलातून, गोलंदाजाला सणसणीत चपराक लगावूनही त्याचा अपमान होणार नाही याची घेतलेली पूर्ण काळजी...

सुनील गावस्करांच्या उदयानं भारतीय फलंदाजांची भंबेरी उडविणारी वेगवान गोलंदाजी असा जो डाग होता तो पुरेपूर पुसला गेला. आजच्या ‘टी-20’च्या जमान्यात त्यांचा कसोटीत दिवसदिवसभर खेळपट्टीवर टिकून राहण्याचा चिवटपणा हा तोंडात बोटंच घालायला लावणारा...बचावात्मक फलंदाज अशी त्यांची प्रतिमा राहिलेली असली, तरी ती भारतीय संघाच्या त्यावेळच्या गरजेतून निर्माण झालेली. गावस्करांबरोबर खेळलेल्या काही खेळाडूंच्या मते, त्यांना नेहमीच गोलंदाजीवर वर्चस्व गाजविणं आवडायचं अन् त्याचं व्यवस्थित दर्शन देशी क्रिकेटमध्ये घडायचं. तिथं ते सहज पूल, हूक खेळताना दिसायचे (पहिल्या विश्वचषकात 60 षटकं खेळून नाबाद 36 धावा काढणाऱ्या ‘लिटल मास्टर’नी नंतर एकदिवसीय क्रिकेटशी कसं जुळवून घ्यावं याचं छान प्रत्यंतर दाखविलं)...

क्रिकेटपटूंचं मानधन वाढावं यासाठी चेतन चौहानांना साथीला घेऊन झटलेल्या गावस्करानी शिखरावर असतानाच कसं निवृत्त व्हावं याचा परिपाठ घातलेला...आपल्या अनुभवांवर पुस्तकं लिहिणं, ‘प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप’च्या माध्यमातून स्तंभलेखन करणं अशी अभिनव पावलं उचलणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू...मध्यंतरी ‘स्पोर्ट्वीक’ या साप्ताहिकाचं संपादन सांभाळताना त्यांनी त्याला दिलेला ‘अल्ट्रा-मॉडर्न’ लूक अनेकांना आज माहीत नसेल...तीच गोष्ट समालोचनाची. निवृत्तीनंतर या क्षेत्रात उडी घेत इतर खेळाडूंना त्यांनी मार्ग दाखविला अन् कधी मिस्किल शेरेबाजी, तर कधी परखड मतप्रदर्शनासह आपला तिथं देखील अविट ठसा उमटविला...‘लिटल मास्टर’च्या वाटचालीवरून नजर टाकल्यास जाणवते ती एकच गोष्ट...गावस्करांसारखा गावस्करच !

विश्वविक्रमांचे डोंगर...

सुनील गावस्करांचे आवडते डाव...

‘लिटल मास्टर’च्या अन्य उत्तुंग खेळी...

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article