For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘विक्रमादित्य’...नाबाद 75 !

06:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘विक्रमादित्य’   नाबाद 75
Advertisement

भारतीय क्रिकेट रसिकांच्या काही पिढ्या वाढल्या त्या सुनील गावस्करांची फलंदाजी पाहत...त्यांचा ‘फ्लिक’, ‘स्ट्रेट ड्राईव्ह’, ‘ऑन ड्राईव्ह’ अन् ‘पर्फेक्ट’ बचाव यांनी जे गारूड घातलं ते अजूनही त्यांच्या मनावरून उतरलेलं नसेल. महाकाय शरीरयष्टीचे गोलंदाज अक्षरश: भाजून काढत असताना एक फारशी उंची नसलेला फलंदाज त्यांना झुगारून लावतोय हे चित्रच मुळी भारतीयांना वेड लावणारं होतं...भारतीय क्रिकेटला ‘सनी डेज’ दाखविणाऱ्या या ‘लिटल मास्टर’नं नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्नानं ‘विक्रमादित्या’ला केलेला हा सलाम...

Advertisement

समोर पलटण कोण उभी होती ?....वेस्ट इंडिजचे अँडी रॉबर्ट्स, स्व. माल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग, ज्योएल गार्नर ही आग ओकणारी महाभयानक चौकडी, पाकिस्तानचे तत्कालीन कर्णधार इम्रान खान नि सर्फराझ नवाज, लेगस्पिनर अब्दुल कादिर, न्यूझीलंडचे ‘स्विंगचे सुलतान’ रिचर्ड हॅडली, ऑस्ट्रेलियाचे डेनिस लीली, थॉमसन व पास्को अन् इंग्लंडचे बॉब विलीस, जेफ अर्नोल्ड, ख्रिस ओल्ड, जॉन स्नो, डेरेक अंडरवूड...पण त्यांना जराही भीक न घालणाऱ्या, निर्भयपणे भिडणाऱ्या ‘त्या’ वामनमूर्तीची जडणघडण झाली ती बार्बाडोससारख्या वेगवान खेळपट्ट्यांचा देश नसलेल्या भारतात आणि तोच खराखुरा चमत्कार...

प्रत्येक दिवशी एक नवं आव्हान स्वीकारण्याइतकं फिटनेस टिकविणं, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16-17 वर्षं फॉर्म राखणं, कसोटी सामन्यांतील त्या महान गोलंदाजांना सातत्यानं ‘हेल्मेट’शिवाय तोंड देणं म्हणजे मस्करी नव्हे...त्यासाठी पाहिजे प्रचंड शिस्त, एखादं व्रत घेतल्याची मानसिकता, विशिष्ट रस्त्यानं जाण्याचा संयम अन् जिगरबाज वृत्ती...सुनील मनोहर गावस्कर !...

Advertisement

.बुधवारी वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या महान सुनील गावस्करांचा रुबाब, त्यांचं ‘पॉझिटिव्ह’ व्यक्तिमत्व, त्यांच्याभोवतीचं वलय...सारंच आगळवेगळं. त्याला तोड नाही, त्याच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही...सुनील गावस्कर या हिमालयाची उंची गाठलेल्या दोन शब्दांना एका लहानशा लेखात बांधणं अतिशय अवघङ..अद्वितीय वेस्ट इंडिज संघाला स्वत:च्या बळावर चिरडणाऱ्या, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, बिशनसिंह बेदी, वेंकटराघवन, इरापल्ली प्रसन्ना, चंद्रशेखर, चेतन चौहान, मोहिंदर अमरनाथ यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंची कारकीर्द फुलताना न्याहाळणाऱ्या सुनील मनोहर गावस्करांची कुठकुठली रुपं आठवावीत तेच कळेनासं होणारं...जवळपास दोन दशकं आपल्या तळपत्या बॅटच्या साहाय्यानं अवघ्या क्रिकेट विश्वावर हुकूमत गाजविलेल्या गावस्करांनी 125 व्या कसोटी  सामन्यात निवृत्ती जाहीर केल्यानंतर वाटलं की, आता क्रिकेट बघायचं तरी कुणासाठी ?....

सुनील गावस्करनी खेळत राहावं असंच वाटायचं. पन्नाशी गाठावी अशी इच्छा उत्पन्न व्हायची आणि अर्धशतक पूर्ण केलं की, वेध लागायचे ते शतकाचे...ताण सतत सहन करणं, कोट्यावधी लोकांचा दबाव पेलणं म्हणजे येरागबाळ्याचं काम नव्हे. गावस्करना सुद्धा ते कधी कधी असह्य झालेलं असणारच, पण त्याचं दर्शन त्यानी कधीही घडविलं नाही...10 जुलै, 1949 रोजी जन्मलेले सुनील गावस्कर म्हणजे देवानं दिलेली व अजूनही टिकलेली जबरदस्त एकाग्रता, बुलंद तंत्र, अफलातून कौशल्य अन् अप्रतिम फटके खेळण्याची ताकद यांचं जणू रसायनच...बलाढ्या गोलंदाजांच्या त्या काळात भारतीय संघाचे पाय लटपटले नाहीत ते केवळ त्यांच्यामुळंच...

इतरावर वर्चस्व गाजविण्याच्या सुनील गावस्कर यांच्या वृत्तीचं दर्शन कारकिर्दीतील पहिल्याच वेस्ट इंडिज दौऱ्यात घडलं होतं अन् त्यानंतर पुन्हा पुन्हा घडतच राहिलं. त्यांचा उत्साह, डावाची सुरुवात करताना केलेली आकर्षक फलंदाजी...सारंच अफलातून, गोलंदाजाला सणसणीत चपराक लगावूनही त्याचा अपमान होणार नाही याची घेतलेली पूर्ण काळजी...

सुनील गावस्करांच्या उदयानं भारतीय फलंदाजांची भंबेरी उडविणारी वेगवान गोलंदाजी असा जो डाग होता तो पुरेपूर पुसला गेला. आजच्या ‘टी-20’च्या जमान्यात त्यांचा कसोटीत दिवसदिवसभर खेळपट्टीवर टिकून राहण्याचा चिवटपणा हा तोंडात बोटंच घालायला लावणारा...बचावात्मक फलंदाज अशी त्यांची प्रतिमा राहिलेली असली, तरी ती भारतीय संघाच्या त्यावेळच्या गरजेतून निर्माण झालेली. गावस्करांबरोबर खेळलेल्या काही खेळाडूंच्या मते, त्यांना नेहमीच गोलंदाजीवर वर्चस्व गाजविणं आवडायचं अन् त्याचं व्यवस्थित दर्शन देशी क्रिकेटमध्ये घडायचं. तिथं ते सहज पूल, हूक खेळताना दिसायचे (पहिल्या विश्वचषकात 60 षटकं खेळून नाबाद 36 धावा काढणाऱ्या ‘लिटल मास्टर’नी नंतर एकदिवसीय क्रिकेटशी कसं जुळवून घ्यावं याचं छान प्रत्यंतर दाखविलं)...

क्रिकेटपटूंचं मानधन वाढावं यासाठी चेतन चौहानांना साथीला घेऊन झटलेल्या गावस्करानी शिखरावर असतानाच कसं निवृत्त व्हावं याचा परिपाठ घातलेला...आपल्या अनुभवांवर पुस्तकं लिहिणं, ‘प्रोफेशनल मॅनेजमेंट ग्रुप’च्या माध्यमातून स्तंभलेखन करणं अशी अभिनव पावलं उचलणारे ते पहिले भारतीय क्रिकेटपटू...मध्यंतरी ‘स्पोर्ट्वीक’ या साप्ताहिकाचं संपादन सांभाळताना त्यांनी त्याला दिलेला ‘अल्ट्रा-मॉडर्न’ लूक अनेकांना आज माहीत नसेल...तीच गोष्ट समालोचनाची. निवृत्तीनंतर या क्षेत्रात उडी घेत इतर खेळाडूंना त्यांनी मार्ग दाखविला अन् कधी मिस्किल शेरेबाजी, तर कधी परखड मतप्रदर्शनासह आपला तिथं देखील अविट ठसा उमटविला...‘लिटल मास्टर’च्या वाटचालीवरून नजर टाकल्यास जाणवते ती एकच गोष्ट...गावस्करांसारखा गावस्करच !

विश्वविक्रमांचे डोंगर...

  • वर्ष 1970-71...कॅरिबियन भूमीवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कारकिर्दीतील चार कसोटी सामन्यांच्या पहिल्याच दौऱ्यात चार शतकं व तीन अर्धशतकं यांच्या साहाय्यानं आठ डावांमध्ये तब्बल 774 धावा...154.80 सरासरीनं ओतलेल्या या धबधब्याला ओलांडणं अजूनपर्यंत कुणालाही जमलेलं नाही...
  • वेस्ट इंडिजविरुद्ध तीन द्विशतकांची नोंद करणारा विश्वातील एकमेव खेळाडू....1971 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन इथं 220 धावांची खेळी, 1978 साली वानखेडेवर 205 धावा आणि 1983 मध्ये चेन्नई इथं कारकिर्दीतील सर्वोत्तम, चौथ्या क्रमांकावर खेळताना नाबाद 236 धावांचा डाव...
  • 10 हजार कसोटी धावा पूर्ण करणारा क्रिकेटच्या जगतातील पहिलावहिला फलंदाज...कारकिर्दीतील 124 व्या कसोटी सामन्यात नि 212 व्या डावात पाकिस्तानविरुद्ध 1987 साली अहमदाबाद इथं त्यांनी हा मान मिळविला...
  • 27 कसोटींतील 48 डावांमध्ये 65.45 धावांच्या सरासरीनं वेस्ट इंडिजविरुद्ध 2749 धावा...जगातील कुठल्याही फलंदाजानं विंडीजविरुद्ध नोंदविलेली ही सर्वोत्तम कामगिरी...
  • वेस्ट इंडिजविरुद्ध तब्बल 13 शतकं...हा देखील जागतिक विक्रम....
  • तीन वेळा कसोटीच्या दोन्ही डावांत शतकं फटकावणारे सुनील गावस्कर हे इतिहासातील एकमेव फलंदाज...त्यात समावेश वेस्ट इंडिजविरुद्ध 1971 साली पोर्ट ऑफ स्पेन इथं काढलेल्या 124 नि 220 धावांचा, पाकिस्तानविरुद्ध कराची इथं नोव्हेंबर, 1978 मध्ये केलेल्या 111 व 137 या खेळींचा आणि वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता इथं 1978 च्या डिसेंबर महिन्यात रचलेल्या 107 अन् नाबाद 182 या डावांचा...
  • कसोटांत 18 विविध साथीदारांसह चक्क 58 शतकी भागीदाऱ्या. या उच्चांकालाही स्पर्श करणं कुणाला जमलेलं नाहीये...
  • कसोटींत महान डॉन ब्रॅडमनच्या 29 शतकांचा उच्चांक मोडीत काढत 30 हून अधिक शतकं झळकविणारे पृथ्वीवरील पहिले फलंदाज...

सुनील गावस्करांचे आवडते डाव...

  • वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस इथं 1971 च्या चौथ्या कसोटीत भारताला वाचविणाऱ्या नाबाद 117 धावा...
  • त्याच दौऱ्यात त्रिनिदाद इथं सामना अनिर्णीत राखणारी 220 धावांची खेळी...
  • 1971 मध्ये ओल्ड ट्रॅफोर्ड इथं वेगवान, उसळत्या, ओल्या खेळपट्टीवर केलेल्या 57 धावा...भारतानं इंग्लिश भूमीत प्रथमच 1-0 नं जिंकली ती ही मालिका...
  • 1974 साली ओल्ड ट्रॅफोर्ड इथंच पुन्हा एकदा अतिशय बोचऱ्या थंडीत केलेला 101 धावांचा डाव...‘त्यामुळं मला आत्मविश्वास पुन्हा मिळविणं शक्य झालं’, गावस्कर सांगतात...
  • 1976 सालच्या विंडीज दौऱ्यात जिंकण्यासाठी 404 धावांची गरज असताना पोर्ट ऑफ स्पेनं इथं भारताच्या सुरुवातीच्या 102 धावांत दिलेलं नाबाद 86 धावांचं योगदान...त्यानंतरच्या 16 धावांसाठी जवळपास तासभर त्यांना झुंजावं लागलं, परंतु शतक मात्र पूर्ण केलंच...

‘लिटल मास्टर’च्या अन्य उत्तुंग खेळी...

  • नाबाद 103 : 1987 साली न्यूझीलंडविऊद्धच्या विश्वचषकातील सामन्यात 88 चेंडूंत 10 चौकार नि तीन षटकारांसह पहिलं एकदिवसीय शतक...
  • 221 : 1979 साली 438 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 490 मिनिटांच्या मॅरेथॉन खेळीत केलेल्या 221 धावांना सर्वोत्कृष्ट खेळी मानलं जातं...
  • 102 : वेस्ट इंडिजविरुद्ध 1976 साली पोर्ट ऑफ स्पेनमध्ये संथ व धावा करणं कठीण असलेल्या खेळपट्टीवर फटकावलेल्या शतकामुळं भारताला 403 धावांचं लक्ष्य सहज पार करण्यास मोलाची मदत झाली...
  • 96 : 1987 च्या पाकिस्तानविरुद्ध कसोटीत बेंगळुरूमधील आखाड्यासारख्या खेळपट्टीवर 320 मिनिटं मुक्काम ठोकून केलेला 264 चेंडूंचा सामना...
  • 113 : 1977 साली 341 च्या लक्ष्याचा पाठलाग करताना ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्ध 320 मिनिटं खेळून झळकावलेलं पहिलं कसोटी शतक....
  • नाबाद 127 : 1983 साली पाकिस्तानविरुद्ध कसोटीत सलामीला येऊन डावाच्या शेवटपर्यंत नाबाद राहिलेले पहिले भारतीय फलंदाज बनण्याचा मान...
  • 121 : वेस्ट इंडिजविरुद्ध 1983 साली दिल्लीत वेस्ट इंडिजच्या तिखट माऱ्याविरुद्ध फक्त 94 चेंडूंत शतक...त्यावेळचं ते पाचवं जलद कसोटी शतक...
  • प्रकार     सामने     डाव        धावा       सर्वोच्च   सरासरी  शतकं     अर्धशतकं             झेल
  • कसोटी   125        214        10122    नाबाद 236            51.12     34           45        108
  • वनडे      108        102        3092      नाबाद 103            35.13     1             27         22
  • प्रथम श्रेणी             348        563        25834    340        51.46     81           105       293
Advertisement
Tags :

.