विक्रम सिंह मजीठिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबचे माजी मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रम सिंह मजीठिया यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मजीठिया हे सुमारे 9 महिन्यांपासून बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी पतियाळा जिल्ह्यातील नाभा तुरुंगात कैद आहेत. हे प्रकरण कथित स्वरुपात 540 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या संपत्तीशी संबंधित आहे.
मागील सुनावणीत मजीठिया यांनी स्वत:च्या जीवाला धोका असल्याचा दावा करत अंतरिम जामिनाची मागणी केली होती. मजीठिया यांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ते डॉ. एस. मुरलीधर आणि पंजाब सरकारच्या वतीने वरिष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायाधीश विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे.
प्रकरणातील परिस्थिती पाहून जामीन देण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मजीठिया यांना एनडीपीएस प्रकरणी 2022 मध्ये जामीन मंजूर झाला होता. हा जामीन रद्द करण्यासाठी पंजाब सरकारने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मागील वर्षी फेटाळली होती.