विजयवीर, सुरुची यांना नेमबाजीत सुवर्ण
विश्व चषक नेमबाजी स्पर्धा, भारताला सहा पदके
वृत्तसंस्था / ब्युनोस आयरीस (अर्जेंटिना)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या विजयवीर सिद्धू आणि सुरुची इंदरसिंग यांनी सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारताने चार सुवर्ण पदकांसह 6 पदके मिळविली आहेत.
पुरुषांच्या 25 मी. रॅपीड फायर पिस्तुल नेमबाजीत पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा नेमबाज विजयवीर सिद्धूने अनुभवी प्रतिस्पर्धी इटलीच्या रिकार्दो मॅझेटीवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विजयवीरने 29 शॉट्स नोंदविले. या क्रीडा प्रकारात इटलीच्या मॅझेटीने रौप्य पदक तर चीनच्या यांग युहाओने कांस्य पदक मिळविले.
महिलांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत भारताची 18 वर्षीय महिला नेमबाज सुरुची इंदरसिंगने 244.6 गुणांची नोंद करत सुवर्णपदक पटकाविले. या क्रीडा प्रकारात चीनच्या क्युयान वेईने 241.9 गुणासह रौप्य पदक तर चीनची दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती जियांग रेनझीनने 221.0 गुणासह कांस्य पदक मिळविले. या क्रीडा प्रकारातील पात्र फेरीमध्ये सुरुचीने 583 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले होते तर भारताची दुहेरी ऑलिम्पिकपदक विजेती मनु भाकर, सुरभी राव, साईनाम आणि सिमरनप्रित कौर यांना मात्र या क्रीडा प्रकाराची अंतिम फेरी गाठता आली नाही.