घर जळालेल्या कुटूंबाला विजयसिंह मोरे युथ फाऊंडेशनचा मदतीचा हात
सरवडे प्रतिनिधी
उंदरवाडी गावाच्या हद्दीलगत शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत येथील शामराव केसरकर यांचे राहते घर भस्मसात झाले. जळीताला शासनस्तरावर मिळणारी मदत तुटपुंजी असते म्हणून सरपंच रणधीर मोरे यांनी मदतीचे आवाहन केले होते. त्या आवाहनानुसार मोरे कुटूंबीय व विजयसिंह मोरे युथ फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला. जमा झालेली रक्कम व साहित्य केसरकर कुटुंबियांना देण्यात आले.
केसरकर कुटुंबियांची आर्थीक स्थिती बेताची आहे. कै. श्री. विजयसिंह मोरे युथ फाऊंडेशन सोशल मिडीया ग्रुपच्या वतीने सोशल मीडियावर मदतीचे एक आवाहन करण्यात आले. या आवाहनाला अनेकजण धावून गेले. आपणही काहीतरी करावे, असे वाटून मदत गोळा करून ती पाठवायची ठरवली. त्या पाच दिवसांत माणुसकीचा प्रत्यय आला. मोरे कुटुंबियांनी धान्य व इतर साहित्य तसेच छतासाठी लागणारे सर्व सिमेंट पत्रे दिले तसेच लोकसहभागातून जमा झालेली रोख रक्कम ८३ हजार ७७५ रूपये सुपूर्द करण्यात आले.
याप्रसंगी डी.के.मोरे, बिद्री व गोकुळचे संचालक आर. के मोरे, सरपंच रणधीर विजयसिंह मोरे, प्रा. अतुल कुंभार, आयडियल ॲकॅडमीचे महेश बुजरे, नामदेव रेपे , विनायक राऊत, धोंडीराम पाटील आकनूरकर, ग्रा.पं. सदस्य शंकरराव कोपार्डेकर, कृष्णात येटाळे, सुरेश कांबळे, जयवंत जरग, शिवाजी कुंभार, संतोष वाईंगडे, मोहन कोतमिरे, सात्तापा कुदळे आदी उपस्थित होते.