For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

व्हिसीके पक्षाच्या अटी अन् थलपतीचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

08:10 PM May 09, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
व्हिसीके पक्षाच्या अटी अन् थलपतीचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा
Tamilnadu politics update
Advertisement

गेले काही दिवस देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेले तमिळनाडूचे राजकारण आता निष्कर्षाच्या अंतीम टप्प्यावर आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. तमिळनाडूचे राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला आमंत्रण देणार? आणि तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? या प्रश्नांची उत्तरं आता जवळपास निश्चित झाली आहेत.

Advertisement

मॅजिक फिगरपेक्षा जास्तीचे आमदार

समोर आलेल्या वृत्तानुसार टीव्हीके पक्षाला व्हीसीके (विदुथलाई चिरुथाइगल काची) पक्षाने आपला पाठिंबा दिल्याने विजय यांच्या पक्षाने बहुमताचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) पक्षानेही टीव्हीकेचे विजय यांना पाठिंबा दिल्यामुळे आता विजय यांचे संख्या 120  इतकी झालेली  आहे. तामिळनाडूत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 118 जागांची गरज असून टीव्हीके (TVK) पक्षाकडे आता मॅजिक फिगरपेक्षा 2 आमदार जास्त आहेत. यामुळे साहजिक थलपती विजयचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Advertisement

पहिल्याच निवडणूकीत मोठं यश 

तामिळनाडूत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने पहिल्याच निवडणुकीत करिश्मा करुन दाखवला. विधानसभा निवडणुकीत तब्बल 108 जागा जिंकत टीव्हीके बहुमताच्या काठावर येऊन पोहोचली आहे. या यशाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही थपलती विजय यांचे अभिनंदन केले. मात्र, सत्ता स्थापनेसाठी त्यांना 10 जागांचं संख्याबळ कमी पडत असल्याने काँग्रेससह इतर पक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यातच, आता थोल थिरुमावलवन यांची पार्टी असलेल्या विदुथलाई चिरुथाइगल काची (व्हिसीके) पक्षानं थलपती विजय यांना पाठिंबा जाहीर केला आहे. व्हिसीके पक्षाकडे 2 आमदार आहेत, या आमदारांसह विजय यांच्या पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला.

VCK पक्षाच्या अटी

व्हिसीके पक्षाने जरी टिव्हीकेला अर्थात थलपती विजय यांच्या पक्षाला पाठिंबा दिला असला तरी काही अटींची पुर्तता टिव्हीकेला करावी लागणार आहे. त्यानुसार व्हिसीकेकडून पाठिंब्याच्या बदल्यामध्ये उपमुख्यमंत्रिपदासह काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हिसीके पक्ष उपमुख्यमंत्रिपदावर अडून बसला आहे, त्यामुळे, आता व्हिसीके पक्षाला उपमुख्यमंत्रीपद मिळते का? आणि नाही मिळाले तर तमिळनाडूच्या राजकारणात पुन्हा नाट्यमय घडामोडी पाहायला मिळणार का? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

VCK Tamilnadu
VCK Cheaf Thirumavalavan

राज्यपाल आणि थलपती विजय भेट

विधानसभेच्या निवडणूकीच्या निकालानंतर अभिनेता विजय यांनी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला, परंतु त्यांच्याकडे केवळ 116 आमदारांची पाठिंब्याची पत्रे होती साहजिकच मॅजिक फिगर ११८ असल्याने बहुमताचा आकडा या मुद्द्यावर सरकार स्थापनेत अडथळा निर्माण झाला होता. यापूर्वीच्या दोन्ही भेटीत , विजय यांनी 6 आणि 7 मे रोजी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. परंतु त्याहीवेळेस 118 आमदारांच्या पाठिंब्याशिवाय त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करता येणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले होते.

Advertisement
Tags :

.