For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजयेंद्र यांचे विरोधकांना प्रत्युत्तर

11:37 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
विजयेंद्र यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
Advertisement

आगामी निवडणूक तयारीच्या निमित्ताने बैठक : आपली बाजू भक्कम करण्यासाठी प्रयत्न

Advertisement

बेंगळूर : आगामी जिल्हा, तालुका पंचायत निवडणुका, बेंगळूर महानगरपालिकेसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष संघटना करण्याच्या उद्देशाने भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली बेंगळुरात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीच्या निमित्ताने विजयेंद्र यांनी पक्षातीलच आपल्या विरोधी गटाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षांतर्गत वाद शमविण्याबरोबरच आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न विजयेंद्र यांनी बैठकीद्वारे केला आहे.

आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखणे, पक्ष संघटना मजबूत करणे, निवडणुकीची तयारी यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी शुक्रवारी बेंगळूरमधील एका खासगी हॉटेलमध्ये पक्षातील पराभूत उमेदवारांची बैठक घेतली. यावेळी विजयेंद्र यांनी पराभूत नेत्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी आपल्याविरोधात दंड थोपटलेल्या आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ, रमेश जारकीहोळी, अरविंद लिंबावळी, कुमार बंगारप्पा व इतर नेत्यांना प्रत्युत्तर देण्याचाही विजयेंद्र यांनी प्रयत्न केला. बैठकीला उपस्थित राहिलेल्या माजी आमदार, माजी विधानपरिषद सदस्यांनी विजयेंद्र यांच्या नेतृत्वाचे समर्थन केल्याचे समजते.

Advertisement

2028 पर्यंत विजयेंद्र यांच्या नेतृत्वात बदल नको, त्यांच्या नेतृत्वाखालीच पुढील निवडणुकांना सामोरे जाता येईल, शक्य झाल्यास पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन याची जाणीव करून देण्याचा निर्णयही घेतल्याचे समजते. आमदार यत्नाळ यांच्या गटाकडून होत असलेल्या स्वतंत्र आंदोलनाला चाप लावावा. त्यांच्यामुळे पक्ष संघटनेला बाधा पोहोचत आहे. पक्षाच्या चिन्हाखालीच सर्व आंदोलने व्हावीत, वैयक्तिक आंदोलन करण्यास मुभा न देण्याची विनंती वरिष्ठांकडेही करता येईल, असे मत अनेकांनी व्यक्त केल्याचे समजते.

बैठकीप्रसंगी बोलताना माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी, विजयेंद्र पूर्ण कालावधीसाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहतील. विरोधी गटातील नेत्यांवर हायकमांड लवकरच कारवाई करेल, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीत माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य, कट्टा सुब्रह्मण्य नायडू तसेच अप्पू पट्टणशेट्टी यांच्यासह काही नेत्यांनी आमदार यत्नाळ यांचे नाव न घेता परखडपणे टीका केली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी देखील जे नाराज आहेत, त्यांनी हायकमांडजवळ बोलून दाखवावे. काँग्रेसविरुद्धच्या आंदोलनात सर्वांनी एकजूट राखावी, असे मत व्यक्त केले. शिवाय ‘भीम संगम’ कार्यक्रमाच्या आवश्यकतेविषयी मत मांडले. बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा, पी. व्ही. कृष्ण भट, तसेच निमंत्रित नेते उपस्थित होते. मात्र, माजी मंत्री बी. श्रीरामुलू, सोमशेखर रेड्डी, माधुस्वामी अनुपस्थित राहीले. त्यामुळे याविषयी बैठकीत उलटसुलट चर्चा रंगली होती.

Advertisement
Tags :

.