विजयेंद्र यांनी घेतली केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांची भेट
बेंगळूर : कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या अधिकार हस्तांतरावरून गोंधळ निर्माण झालेला असतानाच सोमवारी भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केंद्रीयमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास उभयतांमध्ये राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. राज्यात एनडीए आघाडी आणखी मजबूत करणे, प्रशासनात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या भ्रष्ट काँग्रेस सरकारविरुद्ध आंदोलन करण्याची रुपरेषा आखणे यावर कुमारस्वामी यांच्याशी चर्चा केली आहे, असे विजयेंद्र यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारचे प्रशासनातील अपयश, आणि भ्रष्टाचाराविरुद्ध निजद व भाजप पक्षाकडून संयुक्तपणे लढा देण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती नेमण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. मात्र, समितीची रचना झाली नव्हती. ही समिती तातडीने नेमून काँग्रेस सरकारविरुद्धचा लढा तीव्र करण्यासाठी उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते. मागील तीन दिवसांपासून नवी दिल्लीत असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय संघटना सचिव बी. एल. संतोष, पक्षाचे राज्य प्रभारी राधा मोहनदास अगरवाल यांची भेट घेऊन चर्चा केली होती.