नेतृत्व करण्याएवढी विजयेंद्रची योग्यता नाही!
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा टोला
प्रतिनिधी/ बेळगाव
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यावर माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी सडकून टीका केली आहे. ‘तू अजून बच्चा आहेस. अध्यक्षपदासाठी योग्य नाहीस. मला इशारा देण्याएवढा तू मोठा नाहीस. तारीख व वेळ तूच ठरव. शिकारीपूरमध्येच येतो’ अशा शब्दात त्यांनी विजयेंद्र यांना इशारा दिला आहे.
अंकलगी (ता. गोकाक) येथे विविध विकासकामांना चालना दिल्यानंतर विजयेंद्र यांचा उल्लेख करीत ‘तुझ्या वडिलांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मी भाजपात आलो आहे. माझ्या मतदारसंघातील लोक माझ्या मागे ठामपणे उभे आहेत. आपल्याला कोणाचीही भीती नाही. येडियुराप्पा यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. ते आमचे नेते आहेत. मात्र, नेतृत्व करण्यासाठी विजयेंद्रला योग्यता नाही. त्यामुळेच त्याला हटवण्यासाठी आमचे आंदोलन सुरू आहे’ अशा शब्दात रमेश जारकीहोळी यांनी एकेरी भाषेत त्यांच्यावर टीका केली.
येडियुराप्पा यांच्याबद्दल बोललात तर राज्यात फिरणे कठीण होईल, असा इशारा विजयेंद्र यांनी रमेश जारकीहोळी यांना दिला होता. याचा उल्लेख करीत ‘तुझे आव्हान मी स्वीकारले आहे. तारीख तूच ठरव. शिकारीपूरचा दौरा करतो. पोलीस किंवा गनमॅनशिवाय एकटाच येतो. आपल्याला तेवढी ताकद आहे. राज्यात तुझे फिरणे मुश्कील करण्याएवढी ताकदही देवाने मला दिली आहे. मात्र, आपण या पातळीवर उतरणार नाही’ असे रमेश जारकीहोळी यांनी सांगितले.
येडियुराप्पा यांना सल्ला देताना विजयेंद्रच्या मागे लागून पक्षाची आणि तुमची वाट लावून घेऊ नका. चांगले अध्यक्ष येऊ द्या. त्यांना मार्गदर्शन करा. तुमच्यामुळे पक्षाचे भले झाले आहे. पक्षामुळे त्याच्या कितीतरी पटीने तुमचेही भले झाले आहे. त्यामुळे पक्षाला एक समर्थ अध्यक्ष निवडण्यासाठी पुढाकार घ्या, असे सांगितले आहे. या टीकेवरून प्रदेशाध्यक्ष बी. वाय. वियजेंद्र व रमेश जारकीहोळी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला आणखी धार आली आहे.