विजय शंकरची निवृत्तीची घोषणा
स्थानिक क्रिकेटसह आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे केले स्पष्ट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संघाचा स्टार खेळाडू विजय शंकरने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयपीएल 2026 च्या लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यावर बोली लावली नव्हती. यानंतर विजय शंकरने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या निर्णयाची माहिती चाहत्यांना दिली. अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख असलेल्या विजय शंकरने भारतासाठी अनेक महत्त्वाचे सामने खेळले. विजयने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत हा मोठा निर्णय जाहीर केला.
क्रिकेट हेच माझे जीवन आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि तब्बल 25 वर्षांच्या प्रवासात मला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण राहील. आता नव्या संधींच्या शोधासाठी मी घरगुती क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेत आहे. त्याने पुढे बीसीसीआय आणि भारतीय संघाचे आभार मानताना सांगितले की, देशासाठी खेळताना मला खूप काही शिकायला मिळालं. नागपूरमध्ये भारताच्या 500व्या वनडे सामन्यात शेवटचं षटक टाकणं आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेणं हे क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेन, असे तो म्हणाला.
विजय शंकरने भारतासाठी 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 223 धावा केल्या. याशिवाय, 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 25 पेक्षा जास्त सरासरीने 101 धावा देखील केल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, शंकरने 13 शतकांसह 4,253 धावा जमवल्या. लिस्ट ए मध्ये, त्याने दोन शतकांसह 2,790 धावा केल्या. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, त्याने 12 अर्धशतकांसह 2,583 धावा केल्या.