विजय अमृतराजला पद्मभूषण पुरस्कार
रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय टेनिस क्षेत्रातील माजी अव्वल टेनिसपटू विजय अमृतराजला पद्मभूषण पुरस्कार तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा तसेच महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. भारताचा पॅरा अॅथलिट प्रवीण कुमार आणि महिला हॉकीपटू सविता पुनिया यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रविवारी पद्म पुरस्काराची यादी जाहीर करण्यात आली.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 2024 साली बार्बाडोसमध्ये आयसीसीची टी-20 विश्वचषक स्पर्धा तर त्यानंतर म्हणजे 2025 साली दुबईत चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच आयसीसीची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना 131 पद्म पुरस्काराला मान्यता दिली आहे. 2026 मध्ये भारतीय शासनातर्फे 5 व्यक्तींना पद्म विभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले. पद्मश्री पुरस्कार मिळविणाऱ्या यादीमध्ये 19 महिलांचा समावेश आहे. तर 6 व्यक्ती भारतीय रहिवाशी नाहीत. प्रत्येक वर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला जातो.
पुरस्कार विजेते खेळाडू : विजय अमृतराज-पद्मभूषण, बलदेव सिंग, भगवानदास राईकवार, के. पजनीवेल, प्रवीण कुमार, रोहित शर्मा, हरमनप्रीत कौर, सविता पुनिया, ब्लादमीर मेस्टविरीश्विली.