दिवाळीपूर्वी काँग्रेसने जागावाटपाची भूमिका स्पष्ट करावी ; गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची मागणी
मतदारसंघांच्या वाटपावरून दीर्घकाळ चर्चा आणि घासाघीस करण्याची आपली इच्छा नसल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. काँग्रेससोबत पडद्यामागे चर्चा सुरू असून, समान विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचवली असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, 'पीपल्स पाथ' हा उपक्रम समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकतो. या माध्यमातून भविष्यातील राजकीय युतीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे, असे सरदेसाई म्हणाले.
गेल्या वर्षी 'श्रीकृष्ण विजयोत्सवा'च्या निमित्ताने समान विचारसरणीच्या पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अपेक्षित एकता प्रत्यक्षात साकारली नाही. त्यामुळे यावेळी कोणतीही घोषणा करण्याबाबत आपण सावध असल्याचे त्यांनी नमूद केले.
फेब्रुवारी 2027 मध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित असल्याने राजकीय पक्षांनी तयारीला विलंब करू नये. दिवाळीनंतर घरोघरी जाऊन प्रचार सुरू करण्याचा गोवा फॉरवर्डचा विचार आहे. समान विचारसरणीच्या पक्षांना एकत्र यायचे असल्यास आता पुढचे पाऊल उचलण्याची गरज असल्याचेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.
