For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाळ्यापूर्वी हेस्कॉमकडून दक्षता

11:24 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
पावसाळ्यापूर्वी हेस्कॉमकडून दक्षता
Advertisement

जुन्या विद्युतवाहिन्या, धोकादायक फांद्या हटविल्या

Advertisement

बेळगाव : पावसाळ्यात विजेच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी हेस्कॉमकडून विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती, तसेच अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागात, तसेच किल्ला येथील विद्युत केंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या परिसरात दुरुस्ती करण्यात आली.त्यामुळे शहरात दिवसभर विजेचा खेळखंडोबा झाला.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात धोकादायक झाडे व त्यांच्या फांद्या पडून हेस्कॉमचे नुकसान होते. विद्युतवाहिन्या, काँक्रिटचे खांब व ट्रान्स्फॉर्मरवर फांद्या पडल्याने ते निकामी होण्याची शक्यता असते. हे नुकसान टाळण्यासाठी हेस्कॉमकडून मागील दोन दिवसांपासून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी शहराच्या दक्षिण भागात दुरुस्तीचे काम करण्यात आले. विशेषत: उद्यमबाग, अनगोळ, मजगाव या औद्योगिक क्षेत्रात रविवारी कारखान्यांना साप्ताहिक सुटी असल्याने त्या दिवशी दुरुस्तीचे काम करण्यात आले.

Advertisement

मंगळवारी बाजारपेठेतील दुकाने बंद असल्याने सकाळी 10 वाजल्यापासून किल्ला तलाव येथील हेस्कॉम उपकेंद्रात दुरुस्ती करण्यात येत होती. त्याचबरोबर विद्युतवाहिन्यांना अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. याबरोबरच ज्या ठिकाणी विद्युतवाहिन्या जीर्ण झाल्या आहेत, त्या ठिकाणी नवीन वाहिन्या घालण्यात आल्या. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी मार्गे कसा वीजपुरवठा सुरू करता येईल, याचेही नियोजन करण्यात आले आहे.

पावसाळ्यातील नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

पावसाळ्यात विद्युतवाहिन्या व ट्रान्स्फॉर्मरचे नुकसान होऊ नये यासाठी मंगळवारी शहरामध्ये दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. त्याचबरोबर वीजवाहिन्या बदलण्यात आल्या. या कामामुळे शहरात सायंकाळपर्यंत वीजपुरवठा बंद करावा लागला.

-संजीव हणमण्णावर (साहाय्यक कार्यकारी अभियंता)

Advertisement
Tags :

.