विद्यामंदिर टाकवडे, नागेश्वर हायस्कूल राशिवडे जिह्यात प्रथम
कोल्हापूर :
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यामध्ये शाळेबाबत उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी आणि त्या माध्यमातून स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 हे अभियान राबविण्यात आले. 5 ते 15 सप्टेंबर 2014 दरम्यान या अभियानाच्या मुल्यांकनाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये जिह्यातील कुमार विद्यामंदीर टाकवडे आणि खासगी शाळेमध्ये नागेश्वर हायस्कूल राशिवडे या शाळांनी जिह्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर खासगी शाळांमध्ये विभागीय स्तरावर अब्दुललाट येथील न्यू इंग्लिश स्कूलला द्वितीय क्रमांक मिळाला अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबत अध्ययन, अध्यापन व प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे, शिक्षणासाठी पर्यावरणपूरक व आनंददायी वातावरण निर्मिती करणे, क्रीडा, आरोग्य व स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणे राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे, व्यावसायिक शिक्षणाचे महत्व पटवून देणे, व्यक्तीमत्वाच्या जडणघडणीसाठी विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देणे, शिक्षक, विद्यार्थी, पालक माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयीची भावना निर्माण करणे, सीएसआर अंतर्गत शाळांना भरघोस निधी मिळवणे, आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास, विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आदी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शासनाकडून हे अभियान राबविले जात आहे, असे शेंडकर यांनी नमूद केले.
या अभियानांतर्गत विद्यार्थी केंद्रित उपक्रमाचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग याला 60 गुण, शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग याला 40 गुण असे 100 गुणांपैकी शाळांनी किती गुण पटकावले. त्यानुसार शाळेची बक्षिसासाठी निवड केली आहे. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा एका गटात तर दुसऱ्या गटात खासगी व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन गटांत शाळांचे मुल्यांकन केले आहे.
जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शाळा
शासकीय शाळांमध्ये अनुक्रमे कुमार विद्यामंदिर टाकवडे, कन्या विद्यामंदिर तारदाळ, केंद्र शाळा बानगे यांना पुरस्कार मिळाले. खासगी शाळांमध्ये अब्दुललाट येथील न्यू इंग्लिश स्कूलला विभागीय स्तरावरील द्वितीय क्रमांक मिळाला. तर जिल्हास्तरावर अनुक्रमे नागेश्वर हायस्कूल राशिवडे, कुमार भवन, पुष्पनगर, आणि रोझरी इंग्लीश स्कूल, आजरा या शाळांना पुरस्कार मिळाले. तालुकास्तरावर देखील प्रत्येकी खासगी आणि शासकीय शाळांतून प्रत्येकी तीन शाळांना अनुक्रमे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
अभियानात 3678 पैकी 3366 शाळांचा सहभाग
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 या अभियानात जिह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या 3678 शाळांपैकी 3336 शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये राज्यस्तरावरील विजेत्या शाळांना अनुक्रमे 51 हजार 31 हजार आणि 21 हजारांचे बक्षिस आहे. विभाग स्तरावरील विजेत्यांना अनुक्रमे 21 हजार, 15 हजार 11 हजार, जिल्हास्तरावर अनुक्रमे 11 हजार, 5 हजार आणि 3 हजार तर तालुकास्तरावरील विजेत्या शाळांना अनुक्रमे 3 हजार, 2 हजार आणि 1 हजारांचे बक्षिस दिले जाणार आहे.
मीना शेंडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प.कोल्हापूर