आर. बाल्कींच्या चित्रपटात विद्या बालन
चित्रपटाच्या चित्रिकरणाला प्रारंभ
विद्या बालन आणि आर. बाल्की यांनी यापूर्वी 2009 मध्ये प्रदर्शित चित्रपट ‘पा’मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. आता सुमारे 17 वर्षांनी विद्या आणि बाल्की यांची जोडी पुन्हा एकत्र आली आहे. विद्याने सोशल मीडियावर नव्या चित्रपटाची एक झलक शेअर केली आहे. या छायाचित्रात ती हातात स्क्रिप्ट घेऊन असल्याचे दिसून येते.
स्वत:चा नवा लुक शेअर करत विद्याने ‘नवी सुरुवात, आर. बाल्की यांच्यासोबत नवा तमिळ चित्रपट’ अशी कॅप्शन दिली आहे. सध्या चित्रपटाची कहाणी किंवा विद्याच्या भूमिकेविषयी अधिक माहिती समोर आलेली नाही. निर्मात्यांनी देखील याबद्दल गुप्तता बाळगली आहे. विद्याच्या सोशल मीडिया पोस्टमधून चित्रपटावर काम सुरू झाल्याचे कळते. विद्या बालनकडे सध्या अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत. तिचा जेलर 2 हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचबरोबर विद्या ही अक्षय कुमारसोबत एका विनोदी चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीस बझ्मी करत आहेत. हा चित्रपट 4 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
