For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थानमध्ये आज विधानसभा ‘मत’संग्राम

06:57 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
राजस्थानमध्ये आज विधानसभा  ‘मत’संग्राम
Advertisement

199 जागांवर होणार निवडणूक : 1,862 उमेदवार रिंगणात :  राज्यातील 5 कोटींहून अधिक मतदार नवीन सरकार निवडणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राजस्थानमध्ये शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यातील 200 जागांपैकी 199 जागांवर मतदान होत असून 1,862 उमेदवार रिंगणात आहेत. राज्यात 5.25 कोटीहून अधिक मतदार मतदान करू शकतील. मतदानासाठी तीन लाखांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. शनिवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार असून त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले.

Advertisement

राजस्थानमध्ये मुख्य लढत सत्ताधारी काँग्रेस आणि प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यात असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास बदलण्याचा दावा करत असताना भारतीय जनता पक्ष राजस्थान निवडणुकीत विजयी होण्याचा दावा करत आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा आक्रमक निवडणूक प्रचार गुऊवारी सायंकाळी थांबला. यानंतर उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार गुरमीत सिंह कुन्नर यांच्या निधनामुळे करणपूर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.

बडे नेते आजमावणार भवितव्य

सत्ताधारी काँग्रेसकडून नशीब आजमावणाऱ्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी, मंत्री शांती धारिवाल, बी. डी. कल्ला, भंवर सिंग भाटी, सालेह मोहम्मद, ममता भूपेश, राजेंद्र यादव, शकुंतला रावत, उदयलाल अंजना, महेंद्रजित सिंग मालवीय, अशोक चंदना आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह  माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड, विरोधी पक्षाचे उपनेते सतीश पुनिया आणि खासदार दिया कुमारी, राज्यवर्धन राठोड, बाबा बालकनाथ आणि किरोरी लाल मीना हे भाजपचे प्रमुख उमेदवार नशीब आजमावत आहेत.

भाजपने काँग्रेस आमदार गिरराज सिंह मलिंगा, सहा खासदार आणि एका राज्यसभा सदस्यासह 59 विद्यमान आमदारांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने 97 आमदारांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक माजी खासदार ज्योती मिर्धा या नागौरमधून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. नागौरचे खासदार आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे संयोजक हनुमान बेनिवाल हेदेखील विधानसभा निवडणूक लढवत आहेत. या पक्षाने चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पक्षाशी (कांशीराम) युती केली आहे.

भाजप सर्व जागांवर लढत आहे. तर सत्ताधारी काँग्रेसने 2018 च्या निवडणुकीप्रमाणेच भरतपूरची एक जागा आपला मित्रपक्ष राष्ट्रीय लोकदलसाठी सोडली आहे. आरएलडीचे विद्यमान आमदार सुभाष गर्ग भरतपूरमधून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय सीपीआय(एम), राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, भारत आदिवासी पार्टी, भारतीय आदिवासी पक्ष, आम आदमी पार्टी, एआयएमआयएमसह अनेक पक्षही राज्यात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे 40 हून अधिक बंडखोरही रिंगणात आहेत.

निष्पक्ष, अखंड आणि मुक्त मतदानासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले. राज्यात एकूण 36,101 ठिकाणी एकूण 51,507 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यापैकी शहरी भागात एकूण 10,501 आणि ग्रामीण भागात 41,006 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. एकूण 26,393 मतदान केंद्रांवर थेट वेबकास्टिंग करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या मतदान केंद्रांवर जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. संपूर्ण राज्यात 65,277 बॅलेट युनिट, 62,372 कंट्रोल युनिट आणि 67,580 व्हीव्हीपीएटी मशीन रवाना करण्यात आल्या आहेत. निवडणुका मुक्त, निष्पक्ष आणि शांततेत पार पाडण्यासाठी 6,287 सूक्ष्म निरीक्षक आणि 6247 विभागीय अधिकारी राखीव ठेवण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी 1,70,000 हून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :

.