विधानसभेची उमेदवारी कोणाकडेही मागणार नाही ! आमदार प्रकाश आवाडे : धैर्यशील माने यांना विजयी करण्याचे केले आवाहन
इचलकरंजी प्रतिनिधी
काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पसंद पडले. त्यामुळे मी विधानसभा निवडणूकीतील विजयानंतर भाजपला पाठिंबा दिला. मात्र, राजकारणासाठी आजही आमचा ते द्वेष करत आहेत. त्यामुळे मी आता कुणाकडेही विधानसभेची उमेदवारी मागण्यासाठी जाणार नाही. आम्ही आता कुणाच्या घरात डोकावून बघणार नाही, आमच्यात आमचे घर बांधण्याची हिम्मत आहे, असे सांगत आमदार प्रकाश आवाडे यांनी त्यांच्या भाजप पक्ष प्रवेशाला पूर्णविराम दिला. यापुढे आपली सर्व राजकीय वाटचाल ताराराणी पक्षाच्या झेंड्याखालीच राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ताराराणी पक्षाच्या वतीने आयोजित प्रचार मेळाव्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते. आपले हेवेदावे बाजूला ठेवूया, आणि धैर्यशील माने यांना विजयी करुया, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अध्यक्षस्थानी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे होते.
आवाडे म्हणाले, शहरात विविध विकासकामे करताना अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या. 100 कोटी रस्त्यांच्या प्रस्तावाची फाईल 3 वेळा परत आली, आयजीएम व आरटीओ कार्यालयाच्या उद्घाटनाची कागदपत्रे तीन वेळा फाडण्यात आली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझे ऐकले आणि ऑनलाईन उद्घाटन सोहळा पार पडला. मी आतापर्यंत 12 मुख्यमंत्री पाहिले आहेत. त्यातील शिंदे हे अत्यंत चांगले मुख्यमंत्री आहेत. विधानसभेवेळी वेगळी परिस्थीती असणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मनात शंका न आणता माने यांच्या विजयासाठी कामाला लागावे.
राहूल आवाडे म्हणाले, आतापर्यंत 4 वेळा लोकसभा निवडणूकीतून मी माघार घेतली आहे. मी पक्ष व वरिष्ठांना मान देवून मी थांबलो आहे. आता मी कितीवेळा थांबायचे, हे नेत्यांनी ठरवायचे आहे. या निर्णयामुळे माझ्या जवळचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या कार्यकर्त्यांची समजूत मला काढावी लागणार आहे. हातकणंगले, इचलकरंजी व शिरोळ या तीनही विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमदेवार माने यांना मताधिक्य देण्याचे काम आवाडे यांचे कार्यकर्ते करतील.
यावेळी प्रकाश मोरे, उर्मिला गायकवाड, नजमा शेख, सुनिल पाटील, संजय केंगार, प्रकाश पाटील, अहमद मुजावर आदींची भाषणे झाली. आमदार आवाडे यांनी दिलेल्या शब्दाचे कार्यकर्ते पालन करतील व माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा त्यांनी निर्धार व्यक्त केला. आभार बाळासाहेब कलागते यांनी मानले.
राजू शेट्टी यांना टोला
सध्या इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर अनेकजण पर्याय देत आहेत. पण मला कोणताही पर्याय मान्य नाही. पाणी सुळकूड मधूनच आणणार आहे, असे सांगत आमदार आवाडे यांनी माजी खासदार शेट्टी यांचे नाव न घेता टोला लगावला.