रडत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांचा व्हिडिओ प्रसिद्ध
बलूच संघटनांच्या कैदेत पाकिस्तानी सैनिक : पाक सरकारला पर्वा नसल्याची व्यथा व्यक्त
वृत्तसंस्था/ क्वेटा
पाकिस्तानात बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) आणखी एक व्हिडिओ जारी केला असून यात पाकिस्तानी सैनिक स्वत:च्या सरकारकडे मदतीची याचना करताना दिसून येतात. या व्हिडिओत 7 पाकिस्तानी सैनिक दाखविण्यात आले आहेत. आम्ही पाकिस्तानसाठी लढत राहिलो, परंतु आमचे सैन्य आता आम्हाला मानत नाही. माझ्याकडे पाकिस्तानी सैन्याचे ओळखपत्र आहे, मग मी पाकिस्तानी सैनिक नसल्याचे का म्हटले जातेय असे या व्हिडिओत एक पाकिस्तानी सैनिक रडत असा प्रश्न विचारताना दिसून येतो. हा व्हिडिओ पाकिस्तानी सैन्याच्या कुठलाच सैनिक बेपत्ता नसल्याच्या दाव्याला आव्हान देणारा आहे.
बीएलएने 14 फेब्रुवारी रोजी या सैनिकांना पकडले होते. या सैनिकांच्या मुक्ततेच्या बदल्यात बीएलएने बलूच सदस्यांच्या मुक्ततेची मागणी केली आहे. याकरता पाकिस्तान सरकारला 22 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
पाकिस्तान सरकारला कालमर्यादा
हा व्हिडिओ बीएलएचे अधिकृत चॅनेल ‘हक्काल’वर जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारला 7 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला होता, परंतु पाक सरकार कैदेतील सैनिकांना स्वत:चे मानण्यास नकार देत आहे. मग तुम्ही पाकिस्तानी सैनिक आहात हे कसे सिद्ध कराल असे बीएलएचा सदस्य कैदेतील पाकिस्तानी सैनिकांना उद्देशून म्हणत असल्याचे दिसून येते.याच्या उत्तरादाखल सैनिक ‘आम्ही त्यांचे सैनिक नाही असे पाकिस्तानी सैन्य कसे म्हणू शकते’ असे रडत-रडत म्हणत असल्याचे दृश्य यात आहे. सैनिक कॅमेऱ्यासमोर स्वत:चे ऑफिशियल सर्व्हिस आणि ओळखपत्र दाखवत हे तर सैन्याचेच आहे ना, त्यांनीच आम्हाला हे दिले होते. आम्ही हे स्वत: तयार केलेले नाही’ असे सांगतो.
पाकिस्तानी सैन्याचा दावा
या व्हिडिओत 8 जण ओबडधोबड भागात गुडघ्यावर बसलेले दिसून येतात, त्यांच्या शेजारी शस्त्रधारी लोक उभे आहेत. 22 फेब्रुवारीपर्यंत पाकिस्तानी सरकराने सैनिकांच्या अदलाबदलीसाठी चर्चा सुरू न केल्यास कैदेतील सैनिकांना फासावर लटकवू असा इशारा बीएलएने दिला आहे. तर पाकिस्तानी सैन्याधिकाऱ्यांनी एकही सैनिक बेपत्ता नसल्याचा दावा केला आहे.
बलुचिस्तान स्वातंत्र्यासाठी लढा
बीएलए ही संघटना बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तान विरोधात लढत आहे. याची स्थापना 2000 च्या दशकाच्या प्रारंभी करण्यात आली होती. पाकिस्तान बलुचिस्तानच्या नैसर्गिक संपदेची लूट करत बलूच लोकांवर अत्याचार करत असल्याचा बीएलएचा आरोप आहे. बीएलएकडून पाकिस्तानी सैन्य, सरकार आणि चिनी प्रकल्पांना लक्ष्य केले जात आहे.