सैनिकांना ‘व्हिडीओ गेम’ प्रशिक्षण
सध्या व्हिडीओ गेम्सचा प्रचंड बोलबाला आहे. बालकांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांना या गेम्सनी अक्षरश: वेड लावल्याचे दिसून येते. सातत्याने अशा व्हिडीओ गेम्समध्ये डोके (आणि डोळही) घातले तर, मानसिक स्वास्थ्यावर आणि शरीर प्रकृतीवर वाईट परिणाम होतो, असा इशारा तज्ञांनी वारंवार देऊनही हे वेड कमी होत नाही, असे दिसून येते. पण, या व्हिडीओ गेम्सची एक सकारात्मक बाजूही असून ती लक्षात घेण्यासारखी आहे. या गेम्सच्या माध्यमातून विविध प्रकारचे प्रशिक्षण देता आणि घेता येते. वाहने चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या आधी व्हिडीओ गेम्सच्या माध्यमातून पूर्वसज्जता करुन घेतली जाते, हे सर्वांच्या परिचयाचे आहे.
आता सैनिकांनाही युद्ध आणि सशस्त्र संघर्षाचे प्रशिक्षण देण्यासाठी व्हिडीओ गेम्सचा उपयोग करण्यात येत आहे. यासाठी विशेष प्रकारचे व्हिडीओ गेम्स निर्माण करण्यात आले आहेत. सैनिकांची मानसिकता घडविण्यासाठी या गेम्सचा अत्यंत प्रभावीपणे उपयोग करता येतो, असे आढळून आले आहे. तसेच, सैनिकांमध्ये प्रसंगावधानी वृत्ती निर्माण करण्यासाठी आणि त्यांची निर्णयक्षमता वाढविण्यासाठीही हे गेम्स अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. जे प्रशिक्षण प्रत्यक्ष देण्यासाठी बराच खर्च करावा लागतो आणि मोठी जागा लागते, ते प्रशिक्षण व्हिडीओ गेम्सच्या माध्यमातून मर्यादित जागेत आणि कमी खर्चात देता येते. त्यामुळे अशा प्रशिक्षण देण्याकडे सेनाधिकाऱ्यांचा कल वाढत आहे. सैनिकांना ड्रोन्स उडविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी, तसेच विविध शस्त्रास्त्रांची माहिती देण्यासाठी आणि अशी शस्त्रास्त्रे हाताळण्यासाठी त्यांची पूर्वसज्जता करुन घेण्यासाठीही असे व्हिडीओ गेम्स उपयुक्त ठरत आहेत. अर्थातच, प्रत्यक्ष युद्ध हे रणभूमीवरच पेले जाते. त्यामुळे तशा युद्धाचा सराव या सैनिकांकडून नेहमीच्या पद्धतीने करुन घेतला जातोच. पण या प्रत्यक्ष सरावाची उत्तम पूर्वसज्जता व्हिडीओ गेम्सच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते.