विदर्भ बाद फेरीत, बडोदाने गमविली संधी
वृत्तसंस्था/राजकोट
विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेतील गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात अथर्व तायडे आणि रवीकुमार समर्थ यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर विदर्भने आसामनचा 160 धावांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. मात्र या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात बडोदा संघाने चंदीगडचा पराभव करुनही त्यांची बाद फेरीत प्रवेश करण्याची संधी हुकली. विदर्भ आणि आसाम यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भने 50 षटकांत 7 बाद 308 धावा जमविल्या. त्यानंतर आसामचा डाव 35 षटकांत 148 धावांत आटोपला. विदर्भच्या डावात अथर्व तायडेने 80 तर रवीकुमार समर्थने नाबाद 76, यश कदमने 41 धावा जमविल्या. आसामच्या सेनगुप्ताने 3 गडी बाद केले. त्यानंतर आसामच्या डावामध्ये सुमित घाडीगावकरने एकाकी लढत देत नाबाद 80 धावांची खेळी केली. विदर्भच्या पार्थ रेखाडेने 45 धावांत 4 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक: विदर्भ 50 षटकांत 7 बाद 308 (तायडे 80, समर्थ नाबाद 76, कदम 41), आसाम 35 षटकांत सर्वबाद 148 (घाडीगावकर नाबाद 80, रेखाडे 4-45).
बडोदा विजयी, हार्दिकची फटकेबाजी

या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात बडोदा संघाने चंदीगडचा 149 धावांनी दणदणीत पराभव केला. पण त्यांना या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठता आली नाही. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बडोदाचा डाव 49.1 षटकांत 391 धावांत आटोपला. प्रियांशु मुलीयाने 106 चेंडूत 113 धावा झळकविल्या तर हार्दीक पंड्याने चौफेर फटकेबाजी करताना केवळ 31 चेंडूत 9 षटकारांच्या मदतीने 75 धावा झळकविल्या. बडोदा संघाच्या डावामध्ये 14 षटकार आणि 34 चौकार नोंदविले गेले. जितेश शर्माने 33 चेंडूत जलद 73 तर विष्णू सोळंकीने 49 चेंडूत 54 धावा झळकविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना चंदीगडचा डाव 242 धावांत आटोपला. शिवम भांब्रीने एकाकी लढत देत 95 चेंडूत शतक झळकविले. संक्षिप्त धावफलक: बडोदा 49.1 षटकांत सर्वबाद 391 (मुलीया 113, पंड्या 75, जितेश शर्मा 73, सोळंकी 54), चंदीगड सर्वबाद 242 (भांब्री 100)
बंगाल पराभूत
अन्य एका सामन्यात उत्तरप्रदेशने बंगालचा 5 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगालचा डाव 45.1 षटकांत 269 धावांत आटोपला. सुदीपकुमार घर्मीने 94 तर शाहबाज अहमदने 43 धावा झळकविल्या. त्यानंतर उत्तरप्रदेशने 42.2 षटकांत 5 बाद 272 धावा जमवित विजय नोंदविला. ध्रुव जुरेलने दमदार शतक झळकविताना 96 चेंडूत 123 धावा झोडपल्या. रिंकू सिंगने नाबाद 37 धावांचे योगदान दिले. आर्यने जुरेलन 56 धावा केल्या.