बेळगाव जिल्हा संघाची विजयी सलामी
कर्नाटक मिनी ऑलिम्पिक 14 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा
बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटका ऑलिम्पिक असोसिएशन व युथ अॅम्प्लॉयमेंट सर्व्हिस विभाग यांच्यासंयुक्त विद्यमाने मिनी ऑलिम्पिक 14 वर्षांखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाने दावणगेरी संघाचा 7-1 असा पराभव करुन विजयी सलामी दिली. बेंगळूर येथे सुरू असलेल्या मिनी ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने दावणगेरीचादारुन पराभव केला. अवनी सानिकोप्पने 3 गोल करीत हॅट्ट्रिक नोंदविली. तिला जानवी चव्हाण, इफा अत्तार, तनिष्का सप्रे व वैष्णवी संकपाळ यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
हा संघ बेळगावातून बुधवारी बेंगळूरला रवाना झाला. तत्पूर्वी बेळगाव फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष पंढरी परब, उपाध्यक्ष लेस्टर डिसोजा, अमित पाटील, प्रशांत देवदानव यांच्याहस्ते निवड झालेल्या 18 खेळाडूंचा गौरव करण्यात आला. या संघासमवेत प्रशिक्षक म्हणून मानस नाईक यांचाही गौरव करण्यात आला. या संघात वैभवी सायनेकर, तेजल हंसी, मारिया मुजावर, मयुरी तिम्मापूर, मालिका बिडीवाले, जानवी चव्हाण, प्रांजली हजारे, अवनी सानिकोप्प, वैष्णवी होसमनी, तनिष्का सप्रे, इफा अत्तार, रोहिणी कांबळे, इफा बडेभाई, सायली कुडतरकर, क्लेस्टा मधुराई, वैष्णवी संकपाळ, इंद्रायणी पावनोजी, श्रध्दा पाटील आदी खेळाडूंचा समावेश आहे.