विजय स्तंभ...
उत्तरार्ध
लोकांच्या मनात चांगल्या गोष्टी उभ्या करता आल्या पाहिजेत. कारण चांगल्या गोष्टी कायम मनावर कोरल्या जातात. बाकी सगळी थडगी ठरतात. याचा विचार करायला लागलं आणि लक्षात आलं आपले पाय होते म्हणून आपण चालत होतो, कामाच्या ठिकाणी पोहोचत होतो, कर्तृत्वाच्या उड्या मारत होतो, हात होते म्हणून कलाकारी, लेखन, चित्रकारी सुरू होती. सगुण रूपाला डोळ्यासमोर न्याहाळत होतो. निसर्गाची उधळण बघत होतो. बुद्धी होती म्हणून विचार, अविचार करत होतो. माझ्यातला मी स्वत:ला मोठे करण्यासाठी दरवेळी आम्ही वेगवेगळे विजयस्तंभ उभारत असतोच आणि लक्षात येतं असे विजयस्तंभ उभारणारे, संपत्ती पाठवणारे, त्या स्तंभासकटच मातीत केव्हाही मिसळतात. म्हणजे विजयी होऊनही हरणारे जास्त असतात. पण हरून जिंकणारे कायम स्मरणात राहतात. कारण जिंकणाऱ्यांचेही पाय मातीचेच असतात. शेवटी विजयास्तंभासारखे मातीत मिसळतात. मला मध्यंतरी रशियाला भेट देण्याचा योग आला. त्यांनी जपलेला इतिहास, मूर्ती, वेगवेगळे विजयस्तंभ, राजवाडे असं सगळं बघतांना आम्ही एका रस्त्यावरून चाललो होतो. आमच्या मार्गदर्शकाने मध्येच थांबून आम्हाला पायाखालचे रस्त्याचे दगड बघायला सांगितले. त्या दगडांमध्ये काही डिझाईन वगैरे केले का असं मी बघत होतो. पण त्याचे उत्तर फार वेगळेच मिळाले. पहिल्या महायुद्धात जर्मनीला सर्वत्र विजय मिळत असतांना रशियात पण त्यांचं सैन्य मुसंडी मारत होतं. पण रशियन लोकांनी आणि तिथल्या आर्मीने चिवट झुंज देऊन त्याला मागे परतायला भाग पाडलं पण त्याआधीच हिटलरने आपण नक्की जिंकणार असं म्हणून स्वत:चा पुतळा बनवण्यासाठी एक ट्रक भरून दगड आणून ठेवले होते. पण दुर्दैवाने त्यांना हार पत्करावी लागली. आता तेच दगड रशियन लोकांनी रस्त्यासाठी वापरून जगतजेत्याच्या स्वप्नांची पायमल्ली केली, तो हा रस्ता होता. असे कितीतरी दगड अहंकारी लोकांबरोबर स्वार्थामुळे परत भूमिगत झाले. पण काही दगड मात्र लोकांच्या सदभावनेतून सुंदर शिल्प साकारून आठवणीत उरले. त्याची प्रचिती मॉस्कोच्या विमानतळावर उतरल्याबरोबर येते. तिथेच त्यांच्या इतिहासकार पुष्किनचा पुतळा लक्ष वेधून घेतो. कारण लोकांच्या तो मनावर साम्राज्य करणारा ठरला. आपलं आपण उभारतो ते थडगं बनतं आणि दुसरी जेव्हा आपल्या आठवणीत बनवतात त्याची खरं म्हणजे स्मारकं होतात. ही स्मारकं दगडातूनच साकारली पाहिजेत असं नाही