भाजपा उमेदवाराचा विजय हीच रवी नाईक यांना श्रद्धांजली!
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचे प्रतिपादन
फोंडा : फोंडा मतदारसंघाचे दिवंगत आमदार तथा माजी मुख्यमंत्री स्व. रवी नाईक यांनी फोंड्याच्या विकासासाठी दिलेले बहुमूल्य योगदान, कुळ मुंडकारांच्या हक्कासाठी दिलेला लढा हे कार्य अजरामर आहे. तसेच फोंडा मतदारसंघात त्यांनी पहिल्यांदा भाजपाचे कमळ फुलवले. येणाऱ्या पोटनिवडणुकीत त्यांचा हा राजकीय वारसा व विकासपर्व पुढे नेण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराला विजयी करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले. फोंडा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दामू नाईक यांनी मंगळवारी फोंड्यातील भाजपाचे पदाधिकारी तसेच मुख्य कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रवी नाईक यांच्या आजवरच्या राजकीय आणि सामाजिक कार्यावर भाष्य करताना ‘फोंडा क्रीडा प्रकल्प’चे रवी नाईक असे नामकरण केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले.
गेल्या चाळीस वर्षांच्या राजकीय वाटचालीत रवी नाईक यांनी मुख्यमंत्रिपदापासून खासदार, गृहमंत्री अशी सर्वच महत्त्वाची पदे भूषविली. संघर्षातून आणि सामाजिक चळवळीतून पुढे आलेले ते खऱ्या अर्थाने बहुजनांचे लोकनेते होते. कुळ मुंडकारांसाठी सामाजिक लढा देताना सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्यांनी उच्च शिक्षणाची दारे खुली केली. फोंड्याच्या विकासाचा पाया खऱ्या अर्थाने त्यांनीच घातला. येथील बहुतेक प्रकल्प त्यांच्या राजकीय कारकिर्दीत उभे राहिले. त्यांचे हे कार्य आणि राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी येणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन दामू नाईक यांनी केले. येत्या मार्च अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही पोटनिवडणूक होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. भाजपाच्या उमेदवाराबद्दल विचारले असता, काही संभाव्य उमेदवारांची नावे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आली आहेत. निवडणूक जाहीर होताच, पक्षाच्या संसदीय समितीकडून उमेदवार निश्चित करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी रितेश नाईक, रॉय नाईक, नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, अॅङ मनोहर आडपईकर, विश्वनाथ दळवी, आनंद नाईक, हरेश नाईक व उदय डांगी हे उपस्थित होते.