श्रीलंकेत दिसानायकेंच्या युतीचा विजय
अध्यक्षपदापाठोपाठ जिंकली संसदेचीही निवडणूक
वृत्तसंस्था / कोलंबो
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्या युतीने तेथील संसदेच्या निवडणुकीतही मोठे यश प्राप्त केले आहे. नॅशनल पीपल्स पॉवर असे या युतीचे नाव असून या युतीने झालेल्या एकंदर मतदानाच्या 63 टक्के इतकी मते मिळविली असल्याची माहिती देण्यात आली. ही निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले होते. शुक्रवारी बव्हंशी मतांची गणना पार पडली असून राष्ट्राध्यक्षांच्या युतीला निर्णायक आघाडी मिळाली आहे. विरोधकांनी पराभव मान्य केला आहे.
श्रीलंकेच्या संसदेत 225 जागा आहेत. दिसानायके यांची युती बहुतेक जागांवर पुढे आहे. मागच्या संसदेत या युतीकडे केवळ 3 जागा होत्या. राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी अचानकपणे संसद भंग करून मध्यावधी निवडणुकीची घोषणा केली होती. श्रीलंकेतील बहुतेक प्रस्थापित पक्षांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. त्यामुळे युतीचा विजय होणार हे निश्चित होते.
सप्टेंबरात अध्यक्षपद
सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसानायके यांनी मोठा विजय मिळविला होता. त्यानंतर दीड महिन्याच्या अंतरात झालेल्या संसदीय निवडणुकीतही त्यांनी निर्विवाद यश मिळविल्याने आता त्यांची सत्ता त्या देशात स्थिरावली आहे. अध्यक्षांच्याच पुढाकाराने स्थापन झालेल्या युतीने संसदेतही प्रचंड बहुमत मिळविल्यामुळे प्रशासन चालविणे त्यांना सुलभ जाणार आहे.
देशात परिवर्तन होणार
संसदीय निवडणुकीतील विजयाच्या संदर्भात दिसानायके यांनी समाधान व्यक्त केले आहे. आपल्याला मोठ्या बहुमताची अपेक्षा होती. जनतेने आपल्याला हा दुसरा कौल दिला आहे. आता श्रीलंकेत निर्णायक परिवर्तन होणार असून देशाला सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर बनविण्याचे आपले ध्येय साध्य होण्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. हा श्रीलंकेच्या इतिहासातील निर्णायक क्षण असून आपण जनतेचे आभार मानत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली आहे.
स्वबळावर बहुमत
दिसानायके यांच्या स्वत:च्या पीपल्स लिबरेशन फ्रंट या पक्षाला संसदीय निवडणुकीत स्वबळावर दोन तृतियांशापेक्षा अधिक बहुमत मिळेल असे आतापर्यंत पार पडलेल्या मतगणनेतून समोर येत आहे. दिसानायके यांच्या युतीतील इतर छोट्या पक्षांनाही चांगल्या जागा मिळाल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली. या निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने भाग घेत 70 टक्क्यांहून अधिक मतदान केले.
व्यापक परिणाम
दिसानायके यांना संसदीय निवडणुकीत मिळालेल्या या यशाचे श्रीलंकेच्या अंतर्गत राजकीय समीकरणांसमवेत त्या देशाच्या इतर राष्ट्रांशी असणाऱ्या संबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषत: भारताविषयी ते कोणती भूमिका घेतात यासंबंधी राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. दिसानायके या देशाचे अध्यक्ष होण्यापूर्वी चीनचे खंदे समर्थक मानले जात. तथापि, ते अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी भारताशी जुळवून घेतले असून गेल्या दोन महिन्यांमध्ये त्यांनी कोणतीही भारतविरोधी किंवा चीनचे अतिसमर्थन करणारी भूमिका घेतलेली नाही.
परिणाम निश्चित होता
ही निवडणूक दिसानायके यांची युतीच जिंकणार ही प्रारंभापासूनच काळ्या दगडावरची पांढरी रेघ मानली जात होती. मात्र, दीड महिन्यांपूर्वी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्या उत्साहात लोकांनी भाग घेतला होता, तेवढा यावेळी पहावयास मिळाला नाही, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.