For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिमालयातला विजय

06:55 AM Mar 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
हिमालयातला विजय
Advertisement

केंद्र सरकारने पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत झालेली अटक रद्द करण्याचे आदेश जारी केले आहेत. अहिंसक मार्गाने लढणाऱ्या नेतृत्वाची हिंसेच्या कारणासाठीची अटक रद्द झाली हे बरेच झाले. 170 दिवस उशिरा का होईना सरकारने काढलेले हे आदेश लडाख प्रदेशातील शांतता, स्थिरता मजबूत करण्यासाठी आणि सर्व पक्षांशी रचनात्मक संवादाला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरोत. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रदीर्घ कालावधीच्या पुढची तारीख देण्याच्या कामकाजानंतर  याची कोर्टात सुनावणी होणार असताना सरकारने ही सुटका केली आहे. लडाखसह संपूर्ण प्रदेशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील असे सरकारने स्पष्ट केले. 24 सप्टेंबर 2025 रोजी लेह येथे राज्याचा दर्जा आणि संविधानातील सहाव्या अनुसूचीत समावेश करण्याच्या मागणीसाठी हिंसक निदर्शने  झाली होती. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले. 26 सप्टेंबरला सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली होती. आता तो निर्णय मागे घेण्यात आला आहे. हा या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हिमालयाएवढा मोठा विजय आहे. तो केवळ एका कार्यकर्त्याची मुक्तता नव्हे तर पर्यावरण संरक्षणाच्या अहिंसक लढ्याचा संवैधानिक हक्कांचा आणि भारतीय हिमालयीन वारशाचा विजय आहे. सोनम वांगचुक यांचा जन्म 1966 साली लडाखच्या अलची या छोट्या गावात झाला. त्यांनी श्रीनगर येथील राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेतून यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली. वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी विद्यार्थी शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळ ही संस्था स्थापन केली. लडाखी विद्यार्थ्यांना इतर भाषांच्या माध्यमातून शिक्षण दिल्यामुळे 99 टक्के विद्यार्थी अपयशी होत होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वत: चालवलेल्या शाळा उभ्या केल्या. या शाळांमध्ये सौरऊर्जेने गरम केल्या जाणाऱ्या मातीच्या इमारती बांधल्या गेल्या. येथे विद्यार्थी स्वत: प्रशासन चालवतात. वृत्तपत्र आणि रेडिओ चालवतात. आज ही चळवळ हजारो युवकांना स्वावलंबी आणि सर्जनशील बनवते. 2015 साली त्यांनी हिमालयीन पर्याय संस्था सुरू केली. येथे पर्वतीय वास्तवाशी सुसंगत उच्च शिक्षण दिले जाते. 2013 साली सोनम वांगचुक यांनी हिम स्तूप तंत्र विकसित केले. हे तंत्र हिवाळ्यातील व्यर्थ जाणारे पाणी एका शंकूच्या आकारात गोठवून साठवते. हिवाळ्यात हिमनद्यांमधून येणारे पाणी पाईपद्वारे वर फवाऱ्या सारखे उडवले जाते. थंड हवेने ते गोठते आणि शंकू आकारात बर्फ जमा होते. हा शंकू बौद्ध स्तूपासारखे दिसतो. उन्हाळ्यात फक्त बाहेरील थोडासा भाग वितळतो आणि पाणी हळूहळू शेतीसाठी उपलब्ध होते. एक छोटा स्तूप दीड लाख लिटर पाणी साठवतो तर मोठे स्तूप कोट्यावधी लिटर साठवतात. आज लडाखमध्ये बावन्नहून अधिक असे स्तूप कार्यरत आहेत. जगातील चौदा ठिकाणी हे तंत्र लागू झाले आहे. हे तंत्र हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी स्थानिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान एकत्र करते. लडाखच्या शेतकऱ्यांना पाणी मिळते. पशुपालन आणि पर्यावरण संरक्षण मजबूत होते. भारताच्या नद्या कृषी आणि सीमावर्ती स्थिरता यासाठी हे तंत्र अपार उपयोगाचे ठरते.सोनम वांगचुक यांचे कार्य केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाही. त्यांनी 2014 साली एकवीस दिवसांचा उपवास केला. 2014 साली राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीसाठी पदयात्रा केली. त्यांना जागतिक पुरस्कार मिळाले. मात्र आंदोलनानंतर काही समाज माध्यमातील कंटकांनी त्यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ पसरवून त्यांना या राष्ट्रीय सुरक्षा कायदा खालील गुह्यात गुंतवता येईल अशी परिस्थिती निर्माण केली. काही उतावळ्या माध्यमांनी देखील त्यांना देशद्रोही ठरवण्याचा विडा उचलला आणि विनाकारण एका ज्ञानी व्यक्तीला तुरुंगात खितपत पडावे लागले. ते नेहमी गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गावर चालतात. 2025 साली लेह येथील निदर्शनांनंतर त्यांना जोधपूरच्या केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले. चार ऑक्टोबरला त्यांचा मोठ्या भाऊ आणि वकिलाने भेट घेतली. सोनम वांगचुक यांनी कारागृहातून संदेश पाठवला. ते म्हणतात, मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण ठीक आहे. सर्वांच्या काळजी आणि प्रार्थनांसाठी मनापासून आभार. ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांना संवेदना. जखमी आणि अटक झालेल्यांसाठी प्रार्थना. चार मृत्यूंची स्वतंत्र न्यायिक चौकशी होणे आवश्यक आहे. जोपर्यंत ती होत नाही तोपर्यंत मी कारागृहात राहण्यास तयार आहे. लडाखच्या सहाव्या अनुसूचीत समावेश आणि विशेष राज्याचा दर्जा या मागणीत माझा पूर्णपणे सहभाग आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी सर्वोच्च संस्था जी पावले उचलेल त्याचे मी समर्थन करतो. लोकांनी शांतता आणि एकता राखावी. गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गावर शांततेने लढा सुरू ठेवावा. हा संदेश हिमालयी शांततेचा आणि समर्पणाचा आहे. लडाखमध्ये सोनम वांगचुक यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते सक्रिय आहेत. लडाख शिखर संस्थेचे अध्यक्ष थुपस्टन छेवांग हे ज्येष्ठ नेते आहेत. 1990 पासून ते लडाखच्या हक्कांसाठी लढत आहेत. त्यांच्यासोबत चेरिंग दोरजे लक्रुक हे उच्चाधिकार समिती सदस्य आहेत. ते सहाव्या अनुसूचीसाठी आवाज उठवतात. कारगिल लोकशाही संघटनेचे सज्जाद कर्गिली हे कारगिल भागातील मुस्लिम बहुसंख्य कार्यकर्ते आहेत. ते एकता आणि संवादासाठी प्रयत्न करतात. लडाख बौद्ध संघटनेचे त्सेरिंग दोरजे हे शांतता राखण्याचे काम करतात. महिला कार्यकर्त्या डिस्किट गंगजोर आणि नार्डन शुनु यांनी सांस्कृतिक ओळख आणि महिलांच्या हक्कांसाठी आवाज दिला. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो हिमालयीन पर्याय संस्थेच्या सहसंस्थापक आहेत. त्या शिक्षण आणि पर्यावरण क्षेत्रात सक्रिय आहेत. रिगझिन स्पालबार आणि मोहम्मद हनीफा हे लोकसभा प्रतिनिधी संवादासाठी प्रयत्न करतात. लडाखच्या बौद्ध आणि मुस्लिम समाजातील एकता हे या लढ्याचे वैशिष्ट्या आहे. हे सर्व कार्यकर्ते अहिंसक मार्गांनी लढतात. वांगचुक हे हिमालयाचे खरे रक्षक आहेत. त्यांचे हिम स्तूप तंत्र जलसंकट आणि हवामान बदलाविरुद्धचे क्रांतिकारी उपाय आहे. विद्यार्थी चळवळ आणि हिमालयीन पर्याय संस्थेने युवकांना सर्जनशील बनवले. सोनम वांगचुक यांचे कार्य भारतासाठी समर्पित आहे. त्यांनी लाखो भारतीयांना पाणी शिक्षण आणि आशा दिली. आंतरराष्ट्रीय विद्वान संशोधक आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी सोनम वांगचुक यांच्या कामाचे मोठे कौतुक केले. जागतिक नियतकालिकांनी त्यांना हवामान रक्षक म्हणून गौरवले. हिमालयाचे रक्षक सोनम वांगचुक मुक्त झाले आहेत. हा विजय भारताच्या हिमालयीन भविष्याचा आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.