विजय बाबूशचा... झेंडा भाजपचा!
पणजी महापालिकेत पुन्हा बाबूशची सत्ता : एकूण 30 पैकी 27 जागांवर निर्विवाद,उत्पल पर्रीकर यांना केवळ तीन जागा,सर्वांचे लक्ष लागले आता महापौरपदाकडे
पणजी : पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत 30 पैकी 27 जागांवर विजय मिळवून बाबूश मोन्सेरात गटाने पणजी महानगरपालिकेवर पुन्हा आपली सत्ता स्थापन केली आहे. निकाल जाहीर होताच मोन्सेरात गटाने जल्लोष केला. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विजयी उमेदवारांसह नृत्य करून विजयाचा आनंद साजरा केला. ‘आम्ही पणजीकर’ गटाकडून महापौरपदाचे दावेदार असलेल्या सुरेंद्र फुर्तादो यांना पराभवाचा सामना करावा लागला. प्रभाग क्रमांक 6 मध्ये आम्ही पणजीकर गटाच्या शीतल नाईक पराभूत झाल्या. या गटाचे प्रभाग क्रमांक 7 मधील उमेदवार लियोनिद फुर्तादो, प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार जॅक सुखीजा, प्रभाग क्रमांक 29 मधील उमेदवार लिर्बेटा इ. आचारी यांना यश आले. शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मतमोजणी सुरू झाली होती.
सुरूवातीच्या टप्प्यात मोन्सेरात गटाचे विजयी होण्याचे संकेत मिळत होते. दुपारी 12.30 नंतर मोन्सेरात गटामधील बहुतेक उमेदवार विजयी घोषित करण्यात आले होते. बुधवार 11 रोजी झालेल्या निवडणुकीत एकूण 69.07 टक्के मतदान झाले होते. महानगरपालिकेत एकूण 32 हजार 496 मतदार असून त्यातील 22 हजार 445 इतके मतदान झाले होते. यावेळच्या निवडणुकीत आम्ही पणजीकर गटाने कॅसिनोमुळे पणजीत झालेल्या समस्यांवर भर दिला होता. 30 प्रभागांसाठी एकूण 69 उमेदवार होते. यापैकी मोन्सेरात गटाचे 27 विजयी झाले असून त्यांना एकूण 11 हजार 766 मते मिळाली आहेत. उत्पल पर्रीकर यांच्या आम्ही पणजीकर गटाला 3 जागा मिळाल्या असून त्यांना 1 हजार 2 मते मिळाली आहेत. त्यांच्या पराभूत उमेदवारांसह एकूण सुमारे 6000 मते मिळाली आहेत.
जनतेपेक्षा मोठा कुणीही नाही : मोन्सेरात
आजचा हा विजय लोकांचा तसेच भाजप पक्षाचा आहे. भाजप गटाचे नेतृत्व करण्याची आपल्याला पक्षाने संधी दिली, त्याबद्दल आपण पक्षाचे अध्यक्ष आणि पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या गटाला मोठ्या मतधिक्याने विजयी करणारे माझे मतदार यांचा आपण मनापासून आभारी आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले. केवळ तीन जागावर आम्ही हरलो त्याचे दु:ख आहे. काही लोकांना वाटते की आम्हीच पणजीकर मग आम्ही कोण? असा प्रश्न मोन्सेरात यांनी उपस्थित केला.
लोकांचा आपल्यावर विश्वास आहे : चोडणकर
आपण कालही भाजप आणि आजही भाजप कार्यकर्ता आहे. 1994 पासून आतापर्यंत म्हणजे गेली 32 वर्षे आम्ही भाजपचेच आहोत म्हणून मला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. आजचा हा विजय लोकांचा असून त्यांचे मी आभार मानीत आहे, असे प्रभाग क्रमांक 20 मध्ये विजयी झालेले मोन्सेरात गटाचे शुभम चोडणकर यांनी सांगितले.
ही निवडणूक पक्षपातळीवर नव्हे : पर्रीकर
महानगरपालिकेची निवडणूक ही पक्ष पातळीवर नसून ती स्वबळावर होती हे आपण पहिल्या पासूनच सांगत आलो आहे. आम्ही पणजीकर या गटात सर्व पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांना सर्वानी सहकार्य केले होते, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले. पणजीकरांना बदल हवा होता आणि तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला. बाबूश मोन्सेरातसाठी पक्षाचे चिन्ह बाबूशकडे कोणी गहाण ठेवले आहे ते सर्वानाच माहीत आहे, असेही उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
हा विजय मतदारांचा : उदय मडकईकर
विरोधकांनी आमच्या विरोधात केलेला अपप्रचार त्यानाच महागात पडला आहे. बाबूश मोन्सेरात यांनी आपल्यावर विश्वास ठेऊन आपल्याला उमेदवारी दिली त्याबद्दल आपण त्यांचा आभारी आहे. आपण विजयाचा चेहरा असलो तरी खऱ्या अर्थाने हा विजय मतदारांचा आहे, असे उदय मडकईकर यांनी सांगितले.