For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजप कार्यकर्त्यांतर्फे विजयोत्सव

01:18 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
भाजप कार्यकर्त्यांतर्फे विजयोत्सव
Advertisement

पणजी : तीन राज्यांत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद यश मिळविल्याने या तिन्ही राज्यांच्या निवडणूक निकालांचे पडसाद गोव्यात उमटले आणि राज्यातील भाजप कार्यकर्ते व नेत्यांनी काल रविवारी एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. येथील भाजप मुख्यालयात राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी कार्यकर्त्यांसमवेत भाजप पक्षाच्या विजयाच्या घोषणा देऊन एकमेकांना पेढे वाटले. यावेळी पर्यटनमंत्री रोहन खंवटे, पक्षाचे नेते अनिल होबळे, किशोर अस्नोडकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. सदानंद शेट तानावडे म्हणाले, नरेंद्र मोदी हेच जनतेचे खरे सेवक आहेत. विरोधकांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगण या राज्याच्या निवडणुकीदरम्यान भाजपवर बिनबुडाचे अनेक आरोप केले होते. परंतु या आरोपांना जनता बळी पडली नाही आणि शेवटी जनतेनेच तीन राज्यातील विरोधकांना पुन्हा एकदा घरी बसवण्याचे काम केले.चार राज्यांच्या निवडणुकीसाठी गोव्यातून भाजपचे आमदार प्रचारक म्हणून प्रचारसभेला उपस्थित राहिले होते. खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनीही आपले कौशल्य पणास लावून राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यात प्रचारकार्याला झोकून दिले होते. या तिन्ही राज्यात भाजपने स्पष्टपणे बहुमत मिळवल्याने या कामी गोव्यातील आमदार, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचेही मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले.

Advertisement

मोदी यांचीच सत्ता लोकांना हवीय

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मध्यप्रदेश राज्यातील निवडणुकीसाठी प्रचाराची धुरा अत्यंत नेटकेपणाने सांभाळली होती. या राज्यातील नऊ मतदारसंघात विश्वजित राणे यांनी प्रचार केला होता. या नऊही मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. याबद्दल समाधान व्यक्त करताना राणे यांनी सांगितले की, देशात नरेंद्र मोदी आणि भाजप पक्ष हाच एकमेव पर्याय आहे. पंतप्रधान मोदी यांना देशातील लोक अत्यंत कुशल पंतप्रधान म्हणून ओळखतात. पंतप्रधान मोदी यांचीच सत्ता देशातील लोकांना हवी आहे आणि हे राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील निवडणूक निकालाने स्पष्ट झाले आहे, असेही राणे म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :

.