For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निष्काळजीपणाचे बळी

06:19 AM Jun 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
निष्काळजीपणाचे बळी
Scene after the Chinnaswamy stadium stampede in Bengaluru on Wednesday. -KPN ### Chinnaswamy stadium stampede
Advertisement

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाच्या विजयोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा बळी जाणे, हे निष्काळजीपणा, बेफिकीरी व उन्मादाचेच लक्षण म्हटले पाहिजे. मागच्या काही वर्षांत भारतासारख्या देशामध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कमी वेळेत निकाल लावणाऱ्या या झटपट क्रिकेटच्या प्राऊपाला चाहत्यांचीही अधिकची पसंती मिळताना दिसते. स्वाभाविकच या स्पर्धेचा यंदाचा 18 वा हंगामही चांगलाच गाजला. त्यात आत्तापर्यंत जेतेपदापासून दूर राहिलेल्या किंग कोहलीच्या आरसीबी संघाने अजिंक्यपद पटकावल्याने पॅन्सला आकाश ठेंगणे झाले नसेल, तर नवलच. मुळात आपला समाज उत्सवखोर. त्यात क्रिकेट हा तर भारतीयांचा धर्मच. त्यामुळे वर्ल्ड कप असो वा आयपीएलसारखी स्थानिक स्तरावरची स्पर्धा असो. चॅम्पियनशीप मिळविल्यानंतर जल्लोष ओघाने आलाच. परंतु, हा जल्लोष करत असताना मैदानाची एकूण क्षमता, गर्दीचा अंदाज आरसीबी, पोलीस प्रशासन, केसीए वा बीसीसीआयला कसा आला नाही, असा प्रश्न पडतो. बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडिअमची क्षमता केवळ 35 हजार इतकी आहे. साधारण 33 हजार इतकीच तिकीटे दिली जातात. पण, बुधवारी जल्लोषाच्या कार्यक्रमाला तब्बल अडीच लाख लोक आल्याचे सांगितले जाते. क्षमतेपेक्षा अधिक आलेले लोक, त्यांचा उत्साह व पोलीस प्रशासनाचे गर्दीवरील सुटलेले नियंत्रण यामुळे चेंगराचेंगरीला आमंत्रण मिळाले, असे दिसते. पहिले वहिले जेतेपद असल्याने आरसीबीच्या धुरिणांना त्याचे सेलिब्रेशन करावेसे वाटले असेल. पण, हा जल्लोष साजरा करताना आवश्यक तारतम्य बाळगले गेले नाही, हे निश्चित. खरे तर रॉयल चॅलेंजर्सकडून तिकीट वाटप होते. तेच स्टेडियमची सर्व व्यवस्था पाहत होते. तथापि सर्वांना मुक्त आणि मुफ्त प्रवेश दिला गेला असेल, तर या दुर्घटनेस आरसीबी व्यवस्थापनाचा बेजबाबदारपणाही कारणीभूत ठरतो. आता या प्रकरणात आरसीबीशिवाय डीएनए इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. जबाबदार एजन्सीचा अनागोंदी कारभार व निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. इव्हेंट मॅनेजमेंट वा तत्सम कंपन्यांचे सध्या मोठे पेव फुटले आहे. इव्हेंट, त्यातील डामडौल, सजावट यावर या कंपन्या लाखो ऊपये मोजतात. तथापि, सुरक्षेचा विषय त्यांच्या स्तरावर सर्वांत शेवटी असतो. हे दुर्दैवी म्हटले पाहिजे. केसीए व बीसीसीआय हे अनुक्रमे राज्य व देशाच्या क्रिकेटचे नेतृत्व करतो. बीसीसीआय ही भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च संस्था. जगातील श्रीमंत संघटना म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. आयपीएलसारख्या स्पर्धा भरवून बीसीसीआयने क्रिकेटमध्ये पैशाचा पाऊसच पाडला आहे. आयपीएलमुळे स्थानिक स्तरावरील अनेक क्रिकेटर पुढे आले, त्यांना नवा मंच मिळाला, करिअरची व पर्यायाने अर्थार्जनाची दारेही खुली झाली. हे नक्कीच. परंतु, हा सगळा रंगमंच उभा करताना सुरक्षा नियमांच्या बाबतीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ इतके ढिले का राहिले, हा प्रश्न आहे. आता या घटनेतून तरी बीसीसीआयने बोध घेऊन कडक सुरक्षा नियमांबाबत पावले उचलणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाबद्दल काय म्हणावे? बंदोबस्तासाठी दोन ते तीन हजार पोलीस तैनात होते, असे म्हटले जाते. परंतु, लाखो चाहते लोटल्यानंतर पोलिसांना परिस्थितीचा अंदाज यायला हवा. वेळीच पोलिसांनी गर्दी रोखण्याची भूमिका घेतली असती, तर चेंगराचेंगरी टाळणे शक्य झाले असते, असे म्हणायलाही वाव आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारलाही फटकारले आहे. ही चेंगराचेंगरी रोखण्यासाठी तुम्ही काय केले, असा जाब विचारत न्यायालयाने कर्नाटक सरकारला नोटीस बजावली आहे. एवढा मोठा इव्हेंट होत असतानाही वैद्यकीय कर्मचारी, ऊग्णवाहिका व इतर आपत्कालीन व्यवस्थांबाबत हेळसांड होत असेल, तर हे भूषणावह म्हणता येणार नाही. त्यामुळे न्यायालयाने उपस्थित केलेले प्रश्न योग्यच ठरतात. आता या घटनेवरून विराट कोहलीलाही काही मंडळी जबाबदार धरत आहेत. पण, एखाद्या खेळाडूवर या सर्वाचे खापर फोडून मोकळे होण्यापेक्षा एक समाज म्हणून आपण वाहवत तर चाललो नाहीत ना, याचाही विचार केला पाहिजे. स्पर्धा होतात. त्यात कुणीतरी हरतो, कुणी जिंकतो. एका मर्यादेत त्याचे सेलिब्रेशनही ठीक. पण, त्याला उन्मादाचे स्वऊप प्राप्त झाले, की काय होते, याचा बेंगळूरची दुर्घटना हा वस्तुपाठ होय. एका विजयोत्सवाला लाखोंच्या संख्येने चाहते येतात आणि अगदी लहान मुले व कुटुंबकबिल्यासह गर्दी करतात, हेच अतर्क्य होय. क्रिकेटबद्दल प्रेम असण्यात काही गैर नाही. परंतु, या क्रिकेटचा व त्याच्या सेलिब्रेशनचा आनंद घरबसल्याही टीव्हीच्या माध्यमातून लुटण्याची मुभा सर्वांना आहे. असे असताना आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालण्यात काय हशील आहे, याचेही आत्मपरीक्षण गर्दीतल्या चेहऱ्यांनी केला पाहिजे. परवा आरसीबी जिंकली, तेव्हा अगदी पुण्यामुंबईपासून गल्ली बोळात फटाक्यांची आतषबाजीही झाली. एक स्थानिक स्पर्धा कितीतरी शहरांच्या प्रदुषणात भर घालून गेली, हाच याचा अर्थ. अशाच उथळ गोष्टींना समाज प्राधान्य देणार असेल, तर आपले भविष्य काय असेल, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. आता म्हणे बाहेर चेंगराचेंगरी होत असताना मैदानात खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रम सुरू होता. पण, कुणालाच काही कल्पना नव्हती. दोहोंतील अंतरच यातून स्पष्ट होते. भारतासारख्या 140 कोटी लोकसंख्येच्या देशाला चेंगराचेंगरी नवीन नाही. धार्मिक उत्सवात किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता क्रिकेटमध्येही त्याचे लोण पसरत असेल, तर ती काही चांगली गोष्ट नाही. म्हणून भविष्यात चेंगराचेंगरीसारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यावर भर दिला पाहिजे. पूर्व नियोजन, नियोजन आणि सर्व यंत्रणांच्या समन्वयातून यातून मार्ग निघू शकतो.

Advertisement

Advertisement

.