हव्यासाचा बळी
देशातील पुरोगामी राज्य ही महाराष्ट्राची प्रमुख ओळख आहे. भारताच्या सामाजिक सुधारणांच्या चळवळीत बंगाल आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये कायमच अग्रेसर राहिली आहेत. स्त्री शिक्षणाच्या पातळीवर महाराष्ट्राने केलेले कार्य तर ऐतिहासिक मानले जाते. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली. याशिवाय राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुधारककार गोपाळ गणेश आगरकर, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह अनेक सुधारकांनी राज्यात सामाजिक सुधारणांचा पाया घातला. यातूनच खऱ्या अर्थाने आधुनिक विचारांच्या महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली. परंतु, अशा सुसंस्कृत महाराष्ट्रात आजही हुंड्याकरिता वा पैशाकरिता एखाद्या निष्पाप भगिनीचा जीव घेतला जात असेल, तर या महाराष्ट्राची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने सुरू आहे, असा प्रश्न पडतो. मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या हुंडाबळीचे प्रकरण गाजत आहे. प्रारंभी या प्रकरणाकडे एका महिलेची आत्महत्या एवढ्या एकाच चष्म्यातून पाहिले गेले. परंतु, एका पाठोपाठ एक धक्कादायक बाबी उघड झाल्यानंतर या प्रकरणाची व्याप्ती सगळ्यांच्या लक्षात आल्याचे दिसून येते. हगवणे हे मुळशी तालुक्यातील भुकूममधील मातब्बर घराणे. राजेंद्र हगवणे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष. त्यांच्या दांडगाईच्या कथा काही जुनी मंडळी अजूनही सांगतात. हगवणे यांचा मुलगा शशांक हाही काही काळ युवा आघाडीचा पदाधिकारी असल्याचे सांगण्यात येते. या शशांकशी पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या पूर्वाश्रमीच्या वैष्णवी कस्पटे हिचे सूर जुळले. खरे तर या लग्नाला कस्पटे कुटुंबीयांचा विरोध होता. पण, मुलीच्या प्रेमाखातर त्यांनी लग्न मान्य केले. दोघांची संमती असेल, तर बहुतांश आई वडील सध्या त्यामध्ये पडत नाही. लग्न लावून देण्याकडेच त्यांचा कल असतो. वैष्णवीच्या आई वडिलांनीही तेच केले. त्यामुळे यामध्ये त्यांना दोष देता येत नाही. तथापि, हगवणे कुटुंबीयांचा पूर्व इतिहास जाणून घेण्याबरोबरच त्यांचा हेतू समजून घेण्यामध्ये हे सर्व कमी पडल्याचे दिसून येते. वास्तविक, साखरपुडा झाल्यानंतरच हगवणे कुटुंबीयांनी रंग दाखवायला सुऊवात केली होती. तेव्हाच थोडी सावधानता बाळगणे आवश्यक होते. परंतु, त्यांच्या एकेक मागण्यांना कस्पटे कुटुंबीय बळी पडत गेले आणि याच लोभी वृत्तीने त्यांच्या लाडक्या लेकीचा घास घेतला. लग्नसमारंभात आईवडिलांकडून आपल्या मुलीला हौसेने सोनेनाणे व इतरचीज वस्तू दिल्या जातात. त्यात गैर काही नाही. परंतु, प्रेम विवाह असतानाही कस्पटे कुटुंबीयांकडून सुवर्णालंकारापासून ते गाडीघोड्यापर्यंत सगळे काही मागून घेण्यात आले. विवाहसोहळ्यात 51 तोळे सोने, चांदीची भांडी, फॉर्च्युनर गाडी असा शाही नजराणे हगवणेंना देण्यात आला. हा सगळा हुंड्याचाच प्रकार. अगदी राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत फॉर्च्युनर गाडीची किल्ली हगवणे यांच्याकडे सोपविण्यात आली. तेव्हा अजितदादांनीही भर सोहळ्यात गाडी मागून घेतली की स्वखुशीने दिली, असा तिरकस सवाल केल्याचेही बोलले जाते. या व्हायरल फोटोआडून अजितदादांच्या पक्षावरही टीकेचे बाण सोडले गेले. राजकीय पक्ष आणि राजकारण्यांबद्दल सर्वसामान्य माणसाच्या धारणा फार काही चांगल्या नाहीत. हे पाहता हे स्वाभाविकच. तथापि, विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली म्हणून अजितदादांना दोष देता येणार नाही. लोकसंपर्कासाठी वेगवेगळ्या समारंभांना राजकारणी मंडळी उपस्थिती दशर्वतच असतात. त्याच उद्देशाने तालुकाध्यक्षांच्या मुलाच्या लग्नाला ते गेले असावेत. शेवटी मुलीला कसे नांदवायचे, ही जबाबदारी त्या-त्या कुटुंबाची आहे. पण, हगवणे केसमध्ये आधीच लक्ष घातले गेले असते, तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. त्याबाबत महिला आयोगही काहीसा कमी पडला अशी लोकभावना आहे. दादांच्या राष्ट्रवादीच्या ऊपालीताई पाटील व वैशालीताई नागवडे यांनी वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबीयांकडे म्हणजेच आजी-आजोबांकडे सोपविण्यासाठी नक्कीच पुढाकार घेतला. त्यानंतर हगवणे पिता-पुत्रांभोवतीचा फासही आवळण्यात आला आणि आता तर त्यांना अटकही करण्यात आली आहे. ही समाधानानाची बाब ठरते. राजेंद्र हगवणे यांनी आपल्या पहिल्या सुनेचाही छळ केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. याशिवाय ज्या नीलेश चव्हाण यांच्याकडे बाळाला ठेवण्यात आले होते, त्याचाही इतिहास गुन्हेगारीचा असल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणालाही राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा अँगल आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मागच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामधील गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. कोयता गँगची दहशत, खून, मारामाऱ्या हे राज्यातील नित्याचे प्रकार झाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण असो वा खोक्या बोक्यांचे कारनामे असोत. राजकारण हेच या सगळ्यामागचे मध्यवर्ती सूत्र आहे. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये राजकारणी, पोलीस प्रशासन हे हातात हात घालून काम करत असल्याचे पहायला मिळते. बऱ्याचदा तर गुन्हा घडूनही पोलीस फिर्याद घेण्यास टाळाटाळ करतात. त्याचे कारण हे राजकीय दबाव, हेच असते. राजकारणी, गुन्हेगार व पोलीस यांच्या या अभद्र युतीमुळेच दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्थेची स्थिती ढासळत आहे. म्हणूनच महाराष्ट्र शांत व सुरक्षित ठेवायचा असेल, तर ही साखळी प्रथम तोडावी लागेल. हुंड्यासारख्या सामाजिक प्रथेमुळे आजवर अनेक लाडक्या बहिणींना प्राण गमवावे लागले आहेत. काळ बदलला, माणसे शिक्षित झाली खरी. पण, ती सुशिक्षित आणि विचारी झाली का, हा प्रश्न आहे. भव्यदिव्य बंगले, आलिशान गाड्या आणि बाकीच्या श्रीमंतीने भपका तयार होत असेल, पण माणूसपण सिद्ध होत नाही. म्हणूनच हव्यासाचे हे बळी रोखण्यासाठी यापुढेही तुम्हा आम्हाला मुळापासून काम करावे लागेल.