उपराष्ट्रपती जगदीप धनकड उद्यापासून गोवा दौऱ्यावर
पणजी : उपराष्ट्रपती जगदीप धनकड हे बुधवार 21 मे रोजी गोवा दौऱ्यावर येणार असून, ते मुरगाव बंदराला भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते मुरगाव बंदरातील जवानांकडून मानवंदना स्वीकारतील. त्यानंतर नवीन प्रकल्पाचे उपराष्ट्रपती धनकड यांच्या हस्ते राष्ट्रार्पण होणार आहे. उपराष्ट्रपती धनकड हे बुधवारी 21 व गुऊवारी 22 असे दोन दिवस गोवा दौऱ्यावर असणार आहेत. गोवा दौऱ्यात भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या केंद्रिय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेमधील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांशीही उपराष्ट्रपती संवाद साधणार आहेत. मुरगाव बंदर प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधतील. बंदरात असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजावरील अधिकाऱ्यांसोबतही ते संवाद साधणार आहेत. 22 मे रोजी उपराष्ट्रपती भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (आयसीएआर) केंद्रिय किनारपट्टी कृषी संशोधन संस्थेला (सीसीएआरआय) भेट देणार असून तिथे ते प्राध्यापक व शास्त्रज्ञांसोबत चर्चा करतील. राज भवनालाही ते भेट देणार आहेत. तेथे चरक व सुश्रुत यांच्या पुतळ्यांचे अनावरण करतील. चरकांच्या आयुर्वेदातील आणि सुश्रुतांच्या शस्त्रक्रिया विद्येतील योगदानाच्या सन्मानार्थ हे पुतळे उभारण्यात आले आहेत.