गोव्याला जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीचे प्रवेशद्वार बनवणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत; ‘व्हायब्रेट गोवा ग्लोबल बिझनेस समिट 2026’चे दिमाखात उद्घाटन
बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित ‘व्हायब्रेट गोवा ग्लोबल बिझनेस समिट 2026’ या तीन दिवसीय जागतिक व्यापारी परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, युनायटेड किंगडममधील एआय पॉलिसी लॅबचे संस्थापक लॉर्ड उदय नागराजू, गोव्यातील प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास धेंपो यांच्यासह विविध देशांचे उच्चायुक्त, राजदूत आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी जागतिक स्तरावरील सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. पर्यटन क्षेत्राबरोबरच उद्योग, तंत्रज्ञान, डिजिटल अर्थव्यवस्था आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी गोव्यातील उपलब्ध संधींचा अभ्यास करून राज्यात गुंतवणूक करावी. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होण्यासोबतच गोव्याची जागतिक आर्थिक क्षेत्रातील ओळख अधिक मजबूत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यावर भर
राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा सरकार उद्योग आणि व्यापारवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर आहे.
‘व्हायब्रेट गोवा ग्लोबल बिझनेस समिट’मुळे गोव्यातील स्थानिक उद्योजकांना आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि गुंतवणूकदारांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांची जागतिक बाजारपेठेत ओळख निर्माण करण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्याची विकासाकडे वाटचाल : सुरेश प्रभू
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ‘स्वयंपूर्ण गोवा’ या संकल्पनेच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला नवी दिशा देण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या डॉ. सावंत यांनी आपल्या कुशल, संवेदनशील आणि प्रगतीशील नेतृत्वातून गोव्याला विकासाच्या नव्या शिखरावर नेण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रभू म्हणाले.
अंत्योदयाच्या तत्त्वावर विश्वास ठेवणारे आणि ‘वोकल फॉर लोकल’च्या माध्यमातून स्थानिक रोजगाराला चालना देणारे नेतृत्व म्हणून मुख्यमंत्री सावंत यांची ओळख निर्माण झाली आहे. ‘व्हायब्रेट गोवा 2026’सारख्या जागतिक परिषदांमुळे राज्यात आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यास आणि गोव्याला जागतिक व्यावसायिक नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
200 हून अधिक कंपन्यांचे भव्य प्रदर्शन
या परिषदेत तंत्रज्ञान, शाश्वत ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि पर्यावरणपूरक विकास अशा विविध क्षेत्रांतील आधुनिक तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. 200 हून अधिक कंपन्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असून, त्यांच्या उत्पादनांचे आणि तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येत आहे. उद्योग क्षेत्रातील नव्या संधी, आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यावसायिक सहकार्य यांची माहिती मिळविण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.
29 ते 31 ऑक्टोबरदरम्यान आयोजित ही परिषद दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुली राहणार आहे.
50 हून अधिक देशांचे राजदूत, 300 आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी
या जागतिक व्यापार परिषदेला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. 50 हून अधिक देशांचे राजदूत आणि प्रतिनिधी, 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार तसेच 10 हजारांपेक्षा अधिक व्यावसायिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले. उद्योग क्षेत्रातील दिग्गज, गुंतवणूकदार, नवउद्योजक आणि धोरणकर्त्यांच्या उपस्थितीमुळे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम परिसर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक घडामोडींचे केंद्र बनला.
या परिषदेमुळे गोव्यातील उद्योजकांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याची, आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांशी संपर्क वाढविण्याची आणि नव्या गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. स्थानिक उद्योगांना जागतिक स्तरावर नेण्याच्या दृष्टीने ‘व्हायब्रेट गोवा ग्लोबल बिझनेस समिट 2026’ महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
