For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विभवचा आयफोन करणार रहस्योद्घाटन

06:22 AM May 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
विभवचा आयफोन करणार रहस्योद्घाटन
Advertisement

आरोपीला घेऊन मुंबईत पोहोचले दिल्ली पोलीस : डाटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाति मालिवाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 13 मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानात हजर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. या प्रकरणी मुख्य आरोपी केजरीवालांचा खासगी सचिव विभव कुमार आहे. त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विभव चौकशीत सहकार्य करत नसल्याचे समजते.

Advertisement

दिल्ली पोलिसांनी न्यायालयाकडे 7 दिवसांची कोठडी मागितली होती. विभव कुमारने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी विभवला शनिवारी अटक केली होती.

मुंबईशी कनेक्शन

स्वत:चा मोबाईल सोमवारीच मुंबईत फॉर्मेट करण्यात आल्याचा खुलासा आरोपीने चौकशीदरम्यान केला आहे. विभवकुमार आयफोन-15 हा मोबाईल वापरत होता, हा मोबाईल पासवर्ड प्रोटेक्टेड आहे. आरोपीची प्रत्यक्ष उपस्थिती आणि सहाय्याशिवाय हा मोबाईल अनलॉक करणे शक्य नाही. फोन आणि यातील अॅप्सपर्यंत आरोपीच्या मदतीशिवाय अॅक्सेस मिळविता येणार नसल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

सर्व संबंधित ठिकाणी जाणार पोलीस

या प्रकरणाच्या मूळापर्यंत जाण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक मंगळवारी विभवला घेऊन मुंबईत पोहोचले आहे. मुंबईतील प्रवासादरम्यान विभव जेथे-जेथे गेला होता, तेथे पोलीस त्याला तपासासाठी घेऊन जाणार आहेत. विभवने स्वत:च्या मोबाईलला का आणि कुठे फॉर्मेट केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. मुंबईत विभवने ज्या लोकांची भेट घेतली होती, त्यांचे वक्तव्य पोलीस नोंदवून घेतील. पोलिसांनी याप्रकरणी जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे एफएसएलच तपासणीसाठी पाठविली आहेत. विभवची पोलीस कोठडी गुरुवारी रात्री संपणार आहे. त्यापूर्वी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

आयफोनचा डाटा महत्त्वाचा

फॉर्मेटेड किंवा डिलिटेड मोबाईल डाटा रिकव्हर करण्यासाठी त्याला तज्ञांकडे न्यावे लागणार आहे. हा डाटा पुराव्याचा महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. आरोपीने स्वत:चा मोबाईल फोन मुंबईत फॉर्मेट केला होता. कुठल्याही सिस्टीममध्ये एखादी क्लोन कॉपी/डाटा राखून ठेवण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटले होते.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काय करत होता?

आरोपीने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा खासगी सचिव म्हणून कार्यरत असल्याचा दावा केला आहे. परंतु संबंधित प्राधिकरणाने त्याची सेवा यापूर्वीच समाप्त केली होती. अशा स्थितीत तो मुख्यमंत्री कार्यालय/निवासस्थानात काय करत होता असा प्रश्न उभा ठाकला आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संवेदनशील असल्याने त्याची कसून चौकशी केली जाणार आहे. कुणाच्या अधीन राहून तेथे काम करत होतो हे सांगण्यास तो टाळाटाळ करत असल्याचे पोलिसांचे सांगणे आहे.

पुराव्यांसोबत छेडछाड

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये फेरफार करण्यात आल्याचे समारे आले आहे. संबंधित कालावधीतील चित्रण फुटेजमध्ये नसल्याचे समजते.

Advertisement
Tags :

.