‘व्हिआय’ नवी रणनीती आखण्याच्या तयारीत
लवकरच कंपनी नेटवर्क विस्तारणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नुकताच केंद्र सरकारने एजीआरचा वाद सोडवल्यानंतर, व्होडाफोन आयडिया आता भरारी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. वोडाफोन आयडिया( व्हिआय) कंपनीने एक नवीन रणनीती तयार केली असून बँक निधीतून भांडवल उभारून नेटवर्क विस्तार करण्याची योजना आखत आहे. व्हिआयची 45,000 कोटी रुपयांची टर्नअराउंड योजना मुख्यत्वे बँकांकडून मिळणाऱ्या निधीवर अवलंबून राहणार आहे. कारण दूरसंचार क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी पुढील काही महिन्यांत 25,000 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
टेलिकॉम कंपनी पुढील दोन वर्षांत टॉवरची संख्या वाढवण्याची योजना आखत आहे, ज्याचा टॉवर प्रदाता इंडस टॉवर्सवर सकारात्मक परिणाम होईल. बीएनपी परिबासच्या विश्लेषकांनी सांगितले की, व्हिआयची आक्रमक नेटवर्क गुंतवणूक योजना इंडस टॉवर्ससाठी सकारात्मक आहे. फर्मच्या विश्लेषकांनी सांगितले की, सर्व नवीन टॉवर किंवा साइट्स इंडसमध्ये जाऊ शकत नाहीत.
बुधवारी जाहीर केलेली नवीन रणनीती नेटवर्क विस्तार, नफा आणि ग्राहकांच्या सहभागावर केंद्रित आहे.