‘व्हिआय’ला कर्जफेडीस मुदत; समभाग चमकला
कंपनीला कर्ज फेडण्यासाठी 15 वर्षांचा कालावधी : समभाग 8 टक्क्यांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कर्जबाजारी कंपनी व्होडाफोन-आयडिया (व्हिआय)चे समभाग शुक्रवार, 9 जानेवारी रोजी 8 टक्क्यांनी वाढून इंट्राडे उच्चांक 12.40 रुपयांवर पोहोचले. सरकारकडून एजीआर (समायोजित सकल महसूल) थकबाकीच्या पेमेंटसाठी नवीन मुदत आणि सवलतीच्या कालावधीच्या बातमीनंतर कंपनीचे समभाग गुंतवणूकदारांकडून खरेदी करण्यात आले.
सरकारची आता कंपनीला नवी मुदत
कंपनीला पुढील 15 वर्षांत हप्त्यांमध्ये कर्ज फेडण्यासाठी वेळ दिला आहे. सदरचे हप्ते मार्च 2026 पासून सुरू होतील, पेमेंट 2024 पर्यंत दूरसंचार विभागाच्या पत्रानुसार, कंपनीला आर्थिक वर्ष 2006-07 ते आर्थिक वर्ष 2018-19 पर्यंतच्या एजीआर थकबाकीसाठी पेमेंट करण्याची मुभा असणार आहे.
पहिला टप्पा : मार्च 2026 ते मार्च 2031 पर्यंत, दरवर्षी जास्तीत जास्त 124 कोटी रुपये भरावे लागणार आहेत.
दुसरा टप्पा: मार्च 2032 ते मार्च 2035 दरम्यान दरवर्षी 100 कोटी रुपयांचे पेमेंट करावे लागेल.
तिसरा टप्पा: उर्वरित रक्कम मार्च 2036 ते मार्च 2041 दरम्यान समान हप्त्यांमध्ये भरावी लागणार आहे.
याशिवाय, सरकार एक समिती स्थापन करेल जी एजीआर दायित्वांची पुन्हा तपासणी करेल. देय रकमेत काही बदल झाल्यास, ती रक्कम 2036 पासून 6 वर्षांच्या आत भरावी लागणार आहे.
तज्ञांचे मत
तज्ञांचे म्हणणे आहे की, ‘हा टर्निंग पॉइंट की ‘टिक टिक करणारा टाइम बॉम्ब’
सरकारच्या या दिलाशावर बाजारातील तज्ञांमध्ये मतभेद आहेत. एडलिटिकचे संस्थापक आदित्य अरोरा यांचे मत आहे की, व्होडाफोन-आयडिया आता केवळ ‘अस्तित्वा’ची लढाई लढत नाही, तर ही एक ‘टर्नअराउंड’ कथा आहे. मूलभूत गोष्टी हळूहळू सुधारत आहेत.