For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेतवडे येथील शाळेच्या बांधकामाची चौकशी करा ! वेतवडे ग्रामपंचायतीचे जि.प.सीईओंना निवेदन

12:27 PM Apr 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
वेतवडे येथील शाळेच्या बांधकामाची चौकशी करा   वेतवडे ग्रामपंचायतीचे जि प सीईओंना निवेदन
Advertisement

‘तरुण भारत संवाद’च्या वृत्तामुळे ग्रामस्थ ‘अलर्ट’; बोगस कागदपत्रे सादर करून बिल उचलल्याचा आरोप; बांधकामाची चौकशी करू -सीईओ

कोल्हापूर प्रतिनिधी

आदर्श शाळा विकसित करण्याच्या योजनेतून पन्हाळा तालुक्यातील विद्यामंदिर वेतवडे शाळेसाठी 1 कोटी 7 लाख 97 हजार रूपये इतका निधी मंजूर झाला आहे. पण मंजूर निधीतून शाळेचे बांधकाम सुरु केलेले नाही. तरीही प्राथमिक शिक्षण विभागाने संबंधित ठेकेदारास तब्बल 28 लाख 92 हजार 155 रूपयांचे बिल अदा केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सदर कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करावी आणि त्याचा ठेका रद्द करावा अशा मागणीचे निवेदन वेतवडे गावचे सरपंच अनिल पोवार आणि ग्रामस्थांच्यावतीने जिल्हा परिषदेचे सीईओ कार्तिकेयन एस यांना दिले. त्याची दखल घेत संबंधित कामाची चौकशी करून त्यामध्ये दोषी आढळणारे अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्वाही सीईओंनी दिली.

Advertisement

‘वेतवडेतील आदर्श शाळेच्या बांधकामात गोलमाल’ या आशयाचे वृत्त ‘दैनिक तरुण भारत संवाद’ने 15 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर आपल्या गावातील शाळेच्या बांधकामाची काय परिस्थिती आहे ? आणि ठेकेदाराने सदरच्या कामास सुरुवात कण्रयापूर्वीच बिलाच्या पहिल्या हप्त्याची कशी उचल केली आहे ? याची सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांना माहिती मिळाली. त्यामुळे संतप्त झालेले ग्रा.पं.सदस्य आणि ग्रामस्थांनी सीईओ कार्तिकेयन एस यांची भेट घेऊन त्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सर्व शिक्षा अभियानचे अभियंता अमोल पाटील यांची भेट घेऊन संबंधित कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याची मागणी केली.

बातमीनंतर काम सुरु, ग्रामस्थांचा विरोध
वेतवडे येथील आदर्श शाळा बांधकामातील वस्तुस्थितीबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कामाच्या सद्यस्थितीबद्दल माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. त्यामुळे खडबडून झागे झालेल्या ठेकेदाराने लगेच कामगारांचा लवाजमा पाठवून काम सुरु केले. यावेळी ज्ञानमंदिराच्या कामामध्येच जर ठेकेदार गोलमाल करत असेल तर संबंधित ठेकेदाराला यापुढे काम करू दिले जाणार नाही. या कामाची नवीन प्रशासकीय प्रक्रिया राबवून योग्य ठेकादाराकडूनच काम करून घेणार असल्याचा ग्रामस्थांनी पवित्रा घेतला. आणि काम करण्यापासून कामगारांना रोखले. पण विरोध असताना देखील काम सुरु ठेवले जात असल्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने यातून तत्काळ मार्ग काढण्याची गरज आहे. अन्यथा कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Advertisement

बांधकामाचे वास्तव, शिक्षण विभागाची सारवासारव
ठेकेदाराने शाळा बांधकामाच्या ठिकाणी केवळ सळी आणून टाकली आहे. त्याशिवाय शाळेचे कोणतेही बांधकाम केलेले नाही. तरीही फुटींग स्टील, कॉलम स्टिल बांधणीसह अन्य फोटो जोडून शिक्षण विभागाकडून तब्बल 28 लाख 92 हजारांचे बिल ठेकेदाराने उचलले आहे. बिल मंजूर करण्यासाठी शिक्षण विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावामध्ये बांधकामाच्या ठिकाणचे जिओ टॅंगिंगद्वारे घेतलेले फोटो जोडणे आवश्यक होते. पण ठेकेदाराने सादर केलेल्या प्रस्तावामध्ये केवळ जागेचा फोटो जिओ टॅगिंगचा जोडला आहे. उर्वरित बांधकामासाठी काढलेले खड्डे तसेच बांधकामाच्या साहित्याचे फोटो जिओ टॅगिंगचे नसल्यामुळे ते ‘मॅनेज’ केले असल्याचे स्पष्ट होते. वास्तविक बांधकामाच्या ठिकाणी 14 एप्रिलपर्यंत कॉलम काढण्यासाठी कोणतेही खड्डेही काढलेले नव्हते. तरीही ठेकेदारास बिल कसे दिले ? याबाबत संबंधित अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता सदरचे बिल हे बांधकाम साहित्य खरेदी करण्यासाठी दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उत्तरातून त्यांनी अप्रत्यक्षपणे ठेकेदाराची बाजू घेतली असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement
Tags :

.