For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोंड्यात साकारणार पशुचिकित्सा कॉलेज

12:38 PM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
फोंड्यात साकारणार पशुचिकित्सा कॉलेज
Advertisement

कुर्टी-फोंडा येथील पशुसंवर्धन केंद्रात तयारी : ऑक्टोबरपासून प्रवेश प्रक्रियेला होणार प्रारंभ

Advertisement

फोंडा : राज्यातील पहिले गोवा वेटरनरी सायन्स कॉलेज कुर्टी-फोंडा येथील पशुसंवर्धन केंद्रात येत्या ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी काल मंगळवारी पशुसंवर्धन केंद्राला दिलेल्या भेटीवेळी ही घोषणा केली.यावेळी फोंडा पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

साठ विद्यार्थ्यांना मिळेल प्रवेश 

Advertisement

गोवा व आसपासच्या राज्यातील सुमारे 60 विद्यार्थी सामावून घेण्याची क्षमता असलेल्या महाविद्यालयासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. नियोजित पद्धतीनुसार सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास ऑक्टोबरपासून पहिल्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत वेटरनरी काऊन्सिलकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर विद्यापीठाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तज्ञ कमिटीकडून पाहणीनंतर येत्या शैक्षणिक वर्षाला ऑक्टोबर महिन्यात प्रारंभ होईल, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

दोन पदव्याचेच मिळणार शिक्षण

या महाविद्यालयातून बॅचलर ऑफ अॅनिमल हसबन्ड्री व बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स पदवीधर निर्माण होणार आहे. सद्यपरिस्थितीत कुर्टी फोंडा येथील पशुसंवर्धन खात्याचे वेटरनरी इस्पितळ व ओपीडी विभाग बऱ्यापैकी कार्यरत असून त्याचाही लाभ वेटरनरी कॉलेजला प्रात्यक्षिकांसाठी होणार आहे.

सध्या आठ विद्यार्थ्यांना सरकारी मदत 

राज्यात वेटरनरी सायन्स शिक्षणासाठी महाविद्यालय नाही. राज्य सरकार वर्षाकाठी सुमारे 8 विद्यार्थ्यांना सरकारी खर्चावर इतर राज्यात शिक्षण घेण्यासाठी आर्थिक साहाय्य करीत आहे. वेटरनरी कॉलेजचे स्वप्न पूर्ण झाल्यास पशु चिकित्सा व पशुसंवर्धनात रूची असलेल्या विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागणार नाही.  वेटरनरी पदवीधरांना देशात तसेच परदेशातही बरीच मागणी आहे. फोंड्यातील मध्यवर्ती ठिकाणी हे कॉलेज साकारत असल्यामुळे पेडणे ते काणकोणपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सोयीस्कर ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.