ज्येष्ठ लेखिका डॉ.मीना प्रभू यांचे निधन
अभिजात प्रवासवर्णनाचा प्रवास थांबला
प्रतिनिधी/ पुणे
मराठीमध्ये प्रवासवर्णन साहित्य प्रकारात नवा मानदंड निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका डॉ. मीना सुधाकर प्रभू यांचे शनिवारी दुपारी 2 वाजून 38 मिनिटांनी हृदयविकाराने राहत्या घरी निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर रात्रीच्या सुमारास येथील वैकुंठ स्मशानभूमीत कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पुत्र व इंग्लंडमधील सुप्रसिद्ध उद्योजक, अभियंते तुषार प्रभू, आशुतोष प्रभू, कन्या अॅड. वर्षा ऊर्फ रेवती प्रभू-काळे, जावई राहुल प्रभाकर काळे, तसेच सुना रेवती तुषार प्रभू, दिया आशुतोष प्रभू व नातवंडे असा परिवार आहे.
मागच्या काही दिवसांपासून मीनाताईंची प्रकृती ठीक नव्हती. पुण्यातील जोशी हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले हाते. त्यानंतर परवा त्यांना ऊग्णालयातून घरीही आणण्यात आले होते. इंग्लंडहून त्यांची सर्व मुलेही आय. एस. कॉलनी, भोसलेनगर येथील ‘नयन’ निवासस्थानी आली होती. अखेर शनिवारी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
मीनाताईंचे वडील खडकी पॅन्टोन्मेंट कार्यालयात कार्यरत होते. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले. पुण्यातील बी. जे. मेडिकल विद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची पदवी संपादन केली. त्यानंतर मुंबईत जाऊन त्या डीजीओ झाल्या. 1966 मध्ये जागतिक कीर्तीचे बांधकाम व्यावसायिक सुधाकर प्रभू यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. विवाहानंतर 19 वर्षे त्या लंडनमध्ये वास्तव्यास होत्या. त्यातील 15 वर्षे त्यांनी लंडनमध्ये भूलतज्ञ म्हणून काम केले. डॉक्टरी पेशामध्ये असलेल्या मीनाताईंना प्रवासाची आवड होती.
प्रवासवर्णनात नवा मानदंड
लंडनवरील ‘माझं लंडन’ या प्रवासवर्णनाने त्यांना नवी ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी अनेक देशांना भेटी दिल्या व त्या भेटींवर सहजसुंदर प्रवासवर्णनेही साकारली. अपूर्वरंग, इजिप्तायन, उत्तरोत्तर, गाथा इराणी, ग्रीकांजली, चिनी माती, तुर्कनामा, दक्षिणरंग, आदी त्यांची प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत. प्रवासवर्णन लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता. मुख्य म्हणजे मीनाताईंनी आगळ्यावेगळ्या शैलीने प्रवास वर्णनासारख्या काहीशा दुर्लक्षित साहित्याला वेगळी वाट दाखवत. मराठी साहित्यात नवा मानदंड निर्माण केला. त्यांनी एकूण 24 पुस्तके लिहिली. प्रवास वर्णनाशिवाय कादंबरी आणि कविता हे साहित्य प्रकारही मीनाताईंनी हाताळले. त्यांच्या ‘माझं लंडन’ या प्रवासवर्णनाचे इंग्रजी भाषांतर सध्या प्रकाशनाच्या मार्गावर आहे. याशिवाय काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक त्यांनी लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना यश मिळाले नाही.
सामाजिक बांधिलकीची जपणूक
लंडनमध्ये केंब्रिज विद्यापीठात शिकत असलेल्या नातू कार्तिक प्रभू याच्या आकस्मिक निधनाचा त्यांना मोठा धक्का बसला होता. कार्तिकच्या स्मरणार्थ पुण्यात प्रभू ज्ञान मंदिर ही संस्था सुरू करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. मीनाताईंनी अखेरच्या श्वासापर्यंत माणसे जोडली. त्यांच्याशी विविध क्षेत्रातील अनेक मंडळींशी स्नेहबंध होते. विविध ठिकाणी त्यांनी हजारो व्याख्याने दिली. व्याख्याने, सत्कार सोहळा व इतर कार्यक्रमांतून मिळालेला निधी त्या अंधशाळांच्या मदतीकरिता देत असत. यातून त्यांनी कायमच सामाजिक बांधिलकी जोपासली.
डॉ. मीना प्रभू यांचे पती सुधाकर प्रभू हे नामवंत बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध होते. इंग्लंडमध्ये त्यांची इंजिनिअरिंग फर्म फ्रिशमन प्रभू ही कंपनी प्रसिद्ध आहे. अनेक वास्तू साकारणाऱ्या प्रभू यांचा इंग्लंडच्या राणीनेही गौरव केला होता. दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 23 जुलै 2023 रोजी सुधाकर प्रभू यांचे लंडन मुक्कामी निधन झाले. त्यानंतर डॉ. मीना प्रभू यांनीही आपला जीवनप्रवास थांबल्याने प्रभू कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पुण्याबद्दल आत्मियता
डॉ. मीना प्रभू यांनी लंडनमध्ये भूलतज्ञ म्हणून काम करण्याबरोबरच जगाची सफर केली. मात्र, त्यांचे मन खऱ्या अर्थाने रमले ते पुण्यातच. पुण्यातच त्यांची जडणघडण झाली. त्यामुळे पुण्याबद्दल त्यांना आत्मियता होती.
किरण ठाकुर, डॉ. वागळे यांच्याकडून विचारपूस
मीनाताईंची तब्येत ठीक नसल्याने ‘तऊण भारत’चे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर आणि बेळगावचे डॉ. दामोदर वागळे यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
त्यांची पुस्तकं जगभ्रमंती करवतील
मीना प्रभू यांनी मराठी साहित्यात विशेष स्थान मिळवलं होतं. त्यांच्या लिखाणाला विलक्षण प्रतिभा होती. त्यांच्या एकेक पुस्तकासाठी घेतलेले परिश्रम अजरामर आहे. मराठी साहित्य आणि त्यांचे वैद्यकीय शिक्षण या साऱ्याचे त्यांच्या डोक्यात अजब रसायन तयार असायचे. तल्लख बुद्धी, शिक्षण, अनुभव ही त्यांची त्रिसूत्री होती. त्यांच्या लिखाणात सामर्थ्य होते. विज्ञानाचे ज्ञान साहित्यात वाया जात नाही, याचे त्या उदाहरण होत्या. साहित्य व पर्यटन यात त्यांचं अद्वैत स्थान आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके घरबसल्या लोकांना वाचनातून जगभ्रमंती करवतील, अशी प्रतिक्रिया डॉ. किरण ठाकुर यांनी व्यक्त केली.