ज्येष्ठ साहित्यिक,संगीतकार डॉ. भा. वा. आठवले यांचे निधन
देवगड/ प्रतिनिधी
देवगड येथील ज्येष्ठ साहित्यिक, लेखक आणि संगीतकार डॉ. भा. वा. आठवले (95) यांचे गुरुवारी पहाटे सव्वा पाच वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. साहित्याला समृद्ध करणाऱ्या डॉ. भा. वा. आठवले यांच्या निधनाने साहित्यविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.डॉ. भा. वा. आठवले यांनी गेली अनेक वर्षे देवगडमध्ये वैद्यकीय सेवा बजावली होती. वैद्यकीय सेवा बजावताना त्यांचे साहित्य विश्वातही मोठे योगदान राहिले. त्यांच्या काही कादंबऱ्या, अनेक मराठी पुस्तके, लेख प्रकाशित झाले आहेत. संगीत आणि साहित्य हे त्यांचे जीवनविश्व होते. संगीत क्षेत्रात त्यांनी अनेक रागांची निर्मिती करून भारतीय शास्त्रीय संगीत समृद्ध केले. ते एक उत्कृष्ट हार्मोनियमवादक देखील होते. पार्थिवावर देवगड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध स्थरातील मान्यवर, स्थानिक ग्रामस्थ अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. पश्चात पत्नी, वैद्यकीय व्यावसायिक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील आठवले, सुन डॉ. सौ. मंजुषा, नातू डॉ. तन्मय, नातसून असा परिवार आहे.