For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन

06:38 AM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्येष्ठ क्रीडा प्रशासक रणधीर सिंग यांचे निधन
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

ज्येष्ठ क्रीडा प्रशासक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणारे रणधीर सिंग याचे वयोमानानुसार उद्भवलेल्या व्याधींशी झुंज दिल्यानंतर बुधवारी येथे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. निधन होण्यापूर्वी काही दिवस त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.

रणधीर सिंग यांच्या पश्चात त्यांची पत्नी विनीता, तीन मुली, महिमा, सुनैना आणि राजेश्वरी (जी स्वत: नेमबाज आहे) असा परिवार आहे. प्रकृतीच्या कारणास्तव, सिंग यांनी नुकतेच ‘ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशिया’ (ओसीए) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 1991 ते 2015 या काळात संस्थेचे सरचिटणीस म्हणून काम केल्यानतंर 2024 मध्ये त्यांची चार वर्षांच्या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी निवड झाली होती.

Advertisement

‘अतिशय गहिवरलेल्या अंत:करणाने आम्ही राजा रणधीर सिंग यांच्या निधनाची दु:खद बातमी कळवत आहोत. 27 मे 2026 रोजी त्यांनी इहलोक सोडून परलोकी प्रयाण केले,’ असे नॅशनल रायफल्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सचिव राजीव भाटीया यांनी नमूद केले. एक नामवंत ऑलिम्पियन, अर्जुन पुरस्कार विजेते आणि भारत, आशिया तसेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीमध्ये अत्यंत आदरणीय मानले जाणारे क्रीडा प्रशासक असलेल्या राजा रणधीर सिंग यांनी नेमबाजी खेळाच्या विकासात आणि ऑलिम्पिक चळवळीत अमूल्य योगदान दिले आहे. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आणि संपूर्ण नेमबाजी विश्वातील समुदाय या भरुन न येणाऱ्या हानीबद्दल शोक व्यक्त करत आहे आणि त्यांच्या कुटुंबियांना व आप्तजनांना मनापासून संवेदना व्यक्त करत आहे. त्यांच्या थोर आत्म्यास चिरशांती लाभो, असे त्यांनी पुढे नमूद केले.

सिंग यांच्या दैदीप्यमान क्रीडा कारकिर्दीत पाच ऑलिम्पिक सहभागांचा समावेश होता. तसेच 1978 च्या बँकॉक आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅप प्रकारात त्यांनी जिंकलेले ऐतिहासिक सुवर्णपदक विशेष उल्लेखनीय ठरले. ज्यासाठी त्यांना 1979 मध्ये अर्जुन पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्यांचे ऑलिम्पिकमधील सहभाग टोकियो 1964 (राखीव नेमबाज म्हणून), मेक्सिको 1968, म्युनिक 1972, मॉन्ट्रियल 1976, मॉस्को 1980 आणि लॉस एन्जेलिस 1984 या स्पर्धांमध्ये होते. त्यांच्या तितक्याच यशस्वी प्रशासकीय कारकिर्दीत त्यांनी 1987 ते 2010 या काळात भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस म्हणून काम पाहिले. तसेच 2001 ते 2014 या कालावधीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी विविध पदांवर जबाबदारी पार पाडली. 2003 मध्ये त्यांच्या कामाची व्याप्ती अधिक विस्तारली आणि पुढील दोन वर्षांसाठी ते जागतिक उत्तेजक द्रव विरोधी संस्थेमध्ये (डब्ल्यूएडीए) आयओसीचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहिले. पतियाळाचे माजी महाराज आणि क्रिकेटपटू भूपिंदर सिंह यांचे वंशज असलेले रणधीर सिंग हे भारतातील अत्यंत नावाजलेल्या क्रीडा प्रशासकांपैकी एक होते. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या अनेकदा विस्कळीत भासणाऱ्या प्रशासकीय रचनेतही एकमत घडवून आणण्याच्या त्यांच्या कौशल्यामुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरले होते. नेमबाजी क्षेत्रातील त्यांचा वारसा राजेश्वरी हिने समर्थपणे पुढे चालवला आहे. ती स्वत: एक ट्रॅप नेमबाज असून तिने 2016 च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक आणि 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले आहे.

Advertisement
Tags :

.