ज्येष्ठ छायाचित्रकार मधुकर कुडाळकर यांचे निधन
झाराप / प्रतिनिधी
झाराप येथील रहिवासी व कुडाळ येथील कुडाळकर फोटो स्टुडिओचे मालक आणि ज्येष्ठ छायाचित्रकार मधुकर संभाजी कुडाळकर ( 68 ) यांचे सोमवारी दुपारी ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले.त्यांच्यावर 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता झाराप येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ते मधू कुडाळकर या नावाने परिचित होते. आज सोमवारी स्टुडिओ बंद असल्याने ते दुपारी घरी होते.दुपारच्या सुमारास त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यांना लागलीच कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र, तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले.ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातील एक छायाचित्रकार अशी त्याची ओळख होती.कुडाळ - सावंत प्रभावळकरवाडा येथे त्यांनी जवळपास 30 ते 35 वर्षापूर्वी कुडाळकर फोटो स्टुडिओ नावाने व्यवसाय सुरू केला. त्याकाळी दळणवळणाच्या फारशा सुविधा नसताना ग्रामीण भागात जाऊन ते फोटोग्राफी करायचे. दै.तरुण भारतच्या सुरुवातीच्या काळात बरीच वर्षे त्यांनी तरुण भारतचे अधिकृत छायाचित्रकार म्हणून काम केले. तरुण भारत व त्यांचे जवळचे नाते होते.छायाचित्रकार व्यवसायात ते नावारूपास आले. पूर्वी शासकीय कार्यक्रमाची फोटोग्राफी त्यांच्याकडे होती. कुडाळ तालुका पत्रकार समितीचे ते सभासद होते. त्यांना पत्रकारितेतील उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. झाराप ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमनपद त्यांनी भूषविले होते. संत गोरा कुंभार समाज उत्कर्ष मंडळ ( सिंधुदुर्ग ) या संघटना स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. ते पहिले संघटना संस्थापक होते. कुंभार समाजासाठी त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. दशावतारी नाटकांची त्यांना आवड होती.सामाजिक ,धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. ते शांत व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सून ,जावई, भाऊ पाच बहिणी, वहिनी, भावोजी , पुतणे, भाचे व अन्य मोठा परिवार आहे. छायाचित्रकार प्रसाद कुडाळकर तसेच प्राजक्ता, प्रणाली व प्रितेश कुडाळकर यांचे ते वडील, तरुण भारतचे छायाचित्रकार गणेश उर्फ बाळा हरमलकर व सतीश हरमलकर यांचे ते मामा,तर आना कुडाळकर यांचे ते बंधू होत.