For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्येष्ठ क्लोरोनेट वादक बापू साळोखे यांचे निधन

04:27 PM Jan 04, 2024 IST | Kalyani Amanagi
ज्येष्ठ क्लोरोनेट वादक बापू साळोखे यांचे निधन
Advertisement

जुन्या पिढीतील कलेचा उपासक काळाच्या पडद्याआड : साळोखे ब्रास बँडचे कलाकार: मराठी चित्रपटातील गीतांसह तमाशा, लावणी, ऑक्रेस्ट्रात वादन

Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

संगीतकार राम कदम, गायक बाळ जमेनिस,ढोलकी सम्राट यासिन म्हांब्री यांच्यापासून आजच्या पिढीतील संगीतकार शशांक पोवार यांना संगीत साथ देणारे येथील जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध क्लोरोनेट वादक आणि भोसले ब्रास बँडचे मालक बापू उर्फ पप्पेश साळोखे (वय 76 रा. वांगी बोळ, महाव्दार रोड) यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुधा, दोन मुली उर्मिला, शैलजा, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज बुधवारी (दि. 3) सकाळी 10 वाजता पंचगंगा स्मशानभूमीत आहे.

Advertisement

एकेकाळी साळोखे घराण्याचा ब्रास बँड शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक लग्नकार्यात वाजत असे. या साळोखे घराण्यातील बापू साळोखे यांना जन्मजात कलेचा वारसा होता. क्लोरोनेट सारखे अवघड श्वासाशी संबंधित वाद्य वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. क्लोरोनेट वाजविताना त्यांची फुंक अप्रतिम होती. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील महान संगीतकार राम कदम यांच्यासह महान गायक बाळ जमेनिस, ढोलकी सम्राट यासीन म्हाब्री, गीतकार श्रीकांत नरुले यांना क्लोरोनेट वाजवत संगीत साथ दिली. अनेक मराठी चित्रपटांसाठी काम केले. महान गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या गावरान मेवा या एकेकाळी गाजलेल्या कार्यक्रमात साथसंगत केली. सांगलीच्या देवानंद माळी यांच्या मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमात तर बापू साळोखे यांच्या क्लोरोनेट वादनाला वन्समोअर मिळत असे. तमाशा असो, ऑक्रेस्ट्रा असो वा बैठकीची लावणी असो त्यामध्ये बापू साळोखेंचे क्लोरोनेट वादन भाव खाऊन जायचे. मुंबईत राज्य विधिमंडळाच्या प्रागंणात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते आणि तत्कालिन विधानसभेचे अध्यक्ष (कै.) बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी शाहूंवरील पोवाड्याच्या सादरीकरणात बापू साळोखेंचा सहभाग होता. 1997 साली उत्तर प्रदेशच्या तत्कालिन मुख्यमंत्री मायवती आणि बसपचे संस्थापक (कै.) कांशीराम यांच्या पुढाकाराने शाहू महोत्सव (शाहू मेला) झाला. त्यामध्ये कोल्हापुरातून शिवशाहीर राजू राऊत यांच्यासह इतर शाहीरांना साथ दिली होती. वाघा बॉर्डरवर झालेल्या कार्यक्रमातही बापू साळोखेंनी आपली जादू दाखविली होती. ते क्लोरोनेटबरोबरच हार्मोनियम, सॅक्साफोन वादनातही प्रवीण होते. दरम्यान, बापू साळोखेंना शाहीर कलाकारांतर्फे शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी श्रद्धांजली वाहिली.

कमनशिबी महान कलाकार

बापू साळोखे यांना वादक हेमंत आणि सहाय्यक दिग्दर्शक, नेपथ्यकार, मेकअपमन श्रीकांत असे दोन मुलगे होते. या दोघांचे कमी वयात दुर्दैवाने निधन झाले. महान कलाकाराला दोन मुलांच्या लवकर जाण्याचे दु:ख झेलत वाटचाल करावी लागली.

Advertisement
Tags :

.