कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी

06:30 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

बाप्पा म्हणाले, सत्संगतीमुळे मनुष्याला सदगुण प्राप्त होतात. त्यानुसार वर्तन केल्यामुळे व्यवहारातील आपत्तींचा नाश होऊन येथील जीवन हिताचे होते व परलोकातही सुख मिळते. थोडक्यात इह-परलोकात आपला उध्दार करून घेण्यासाठी संतसंग करावा. संतसंग करायचा म्हणजे संतांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या उपदेशाप्रमाणे वागायचं. त्यासाठी वेद उपनिषदावर आधारित असलेल्या त्यांच्या ग्रंथाचा अभ्यास करावा. त्यामध्ये व्यवहारिक जगात कोणत्या प्रसंगी कसं वागायचं याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केलेलं असतं.

Advertisement

संत हे ईश्वराचं सगुण रूप असल्याने ते सांगतात ते पूर्णपणे बरोबर आणि आपल्या हिताचे असतं. त्यामुळे त्यानुसार वागणं आपल्या भल्याचं आहे अशी खात्री बाळगावी. आत्ता या क्षणी घडलेली गोष्ट कदाचित आवडणारी नसली तरी कालांतराने घडलेली गोष्टच हिताची आहे हे लक्षात येते. म्हणून कधीही सत्संग सोडू नका. जे मनापासून संत दर्शन घेतात, त्यांच्या उपदेशाचे विपरीत परिस्थितीतही श्रद्धेने पालन करतात त्यांच्यात गुणांची उत्पत्ती होते, दुर्गुण कमी कमी होत नाहीसे होतात, आपत्तींचा नाश होतो आणि इहलोकी व परलोकी स्वहित प्राप्त होते. मग मनात प्रश्न असा उत्पन्न होतो की, मनुष्य जन्माचे कल्याण होण्याच्या दृष्टीने जर संतसंगाचे इतके महत्त्व आहे तर सर्वांना संत संग करावा असे वाटत नाही कारण बहुतेकजण मायेच्या प्रभावाखाली वावरत असतात. त्यामुळे त्यांना ते कर्ते आहेत, असे वाटत असते आणि ते समोर दिसणारी दुनिया खरी आहे असे समजत असतात. साहजिकच त्यांना सत्संगतीपेक्षा बाह्य दुनियेचे आकर्षण जास्त वाटत असते. म्हणून बाप्पा पुढील श्लोकात असे सांगत आहेत की, सत्संगती अतिशय दुर्लभ असून काहीतरी पूर्वसुकृत असल्याशिवाय सत्संगती करावी अशी इच्छा होत नाही.

इतरत्सुलभं राजन्सत्संगो तीव दुर्लभ ।

यज्ञात्वा पुनर्बन्धमेति ज्ञेयं ततस्तत ।। 43 ।।

अर्थ-हे राजा, इतर गोष्टी सुलभ आहेत, पण सत्संग अतिशय दुर्लभ आहे. याचे ज्ञान झाले म्हणजे कोणत्याही गोष्टीपासून मनुष्य पुन्हा बंध पावत नाही असे जाण. विवरण-मनुष्य हा मायेच्या प्रभावाखाली वावरत असतो. ही माया त्याची आणि त्याच्या आध्यात्मिक भल्याची गाठच पडून देत नाही. म्हणून त्याला सत्संग सोडून इतर गोष्टी आवडत असतात. कारण पैशाच्या, अधिकाराच्या जोरावर व कुसंगतीमुळे इतर गोष्टी सुलभ म्हणजे प्रयत्नाने मिळू शकतात. मनुष्य एकदा त्यांच्या नादाला लागला की, आणखीन आणखीन बिघडतच जातो. लोकप्रियता, संपत्ती, मुलाबाळांचा मोह ही आकर्षणे त्याला खुणावत असतात. माणसाने त्यांच्याप्रती असलेले आपले कर्तव्य आवश्य करावे परंतु त्यांचा मोह धरू नये. परंतु असे घडत नसल्याने या सगळ्या जंजाळातून सुटका होऊन सत्संग करावासा वाटणं ही आहोभाग्याची गोष्ट आहे. पूर्वसुकृताची जोड असल्याशिवाय सत्संगाची गोडी लागत नाही. थोडक्यात तो कुठेही प्राप्त होण्यासारखा म्हणजे सुलभ नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी...सर्व सुखाचे आगरु बापरखुमादेवीवरु.. पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते. म्हणजे गेल्या जन्मी नीती धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल. बाप्पा पुढे म्हणतात सत्संग लाभला व त्यानुसार श्रद्धेने वर्तणूक झाली की, त्याच्या हातून जे कार्य घडते ते जणू तो ईश्वराच्या सगुण रूपात करत असलेले कार्य ठरते. साहजिकच त्याला ते बंधनकारक होत नसल्याने त्याचे नवीन प्रारब्ध तयार होत नाही व तो जन्ममृत्युच्या चक्रातून मुक्त होतो.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article